गोव्यातील नारवे (ता. बिचोलीम) येथील श्री कनकेश्वरी शांतादुर्गा पंचायत संस्थानाचे महाजन असून देखील आम्हाला निवडणूक प्रक्रिया तसेच देवीची सेवा करण्यापासून जाणून बुजून वंचित ठेवले जात आहे. तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सदर संस्थानाच्या बेळगावातील कलघटगी महाजनांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी बेळगाव दौऱ्यावर आलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चेंबर ऑफ कॉमर्सला भेट दिली.
त्याप्रसंगी नारवे (ता. बिचोलीम) येथील श्री कनकेश्वरी शांतादुर्गा पंचायत संस्थानाचे महाजन असलेले बेळगावातील विकास आर. कलघटगी, हेमंत आर. कलघटगी आणि विरेन व्ही. कलघटगी यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्री सावंत यांना सादर केले. निवेदन स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी आस्थेने सर्व तक्रार ऐकून घेऊन गोव्याला जाताच तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या कांही पिढ्यांपासून बेळगावात असलेले आम्ही नारवे (ता. बिचोलीम, गोवा) येथील श्री कनकेश्वरी शांतादुर्गा पंचायत संस्थांचे महाजन आहोत. आम्ही मूळचे गोव्याचे असून पोर्तुगीज काळातील धार्मिक दडपशाहीमुळे आम्हाला स्थलांतर करून बेळगावात स्थायिक व्हावे लागले. आमच्या कुटुंबातील सदस्यांनी उपरोक्त संस्थानाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. परंतु 2019 ते 2025 या कालावधीतील संस्थानाच्या व्यवस्थापन समितीतील कांही महाजन जाणीवपूर्वक आम्हाला संस्थानाची निवडणूक प्रक्रिया व देवीची सेवा करण्यापासून दूर ठेवण्याद्वारे त्रास देत आहेत.
या संदर्भात आम्ही बिचोली मामलेदार आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. प्रत्येक जण व आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे. परिणामी तीन महिन्यापूर्वी आम्ही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना नोटीस देखील पाठवली.
मात्र तरीही अजून पर्यंत आमच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. तरी आपण कृपया याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती, अशा आशयाचा तपशील विकास कलगटगी, हेमंत कलघटगी आणि विरेन कलघटगी यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.