बेळगावच्या खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी काल मोठ्या दिमाखात उद्घाटन केल्यानंतर अवघ्या 24 तासात तिसऱ्या रेल्वे गेट येथील नूतन उड्डाण पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.
त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यासोबतच ‘काल थर्ड गेट ओव्हर ब्रिजचे उद्घाटन संपन्न झाले आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा फोटो. देखो खड्डा आ गया….. 40 टक्के कमिशन एकदम ओके..’ हा उपरोधात्मक मजकूर गाजत आहे.
बेळगाव शहरातील चारही उड्डाण पूल कायमच वादग्रस्त ठरले आहेत. गोगटे सर्कल येथील उड्डाणपूल असो, कपिलेश्वर उड्डाणपूल असो अथवा जुन्या पीबी रोडवरील छ. शिवाजी महाराज उड्डाण पूल असो या तीनही उड्डाणपूलांच्या बाबतीत सुरुवातीच्या काळात पुलावरील रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाबाबत साशंकता व्यक्त करून ते निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करण्यात आला होता.
तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाण पूल देखील त्याला अपवाद नसून या पुलाच्या बाबतीतही निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आरोप केला जात आहे. आधीच सदर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यास प्रचंड विलंब लावण्यात आला आहे. आता उद्घाटन होऊन अवघे 24 तास उलटण्याच्या आत सदर नव्या उड्डाण पुलाच्या रस्त्यावर एक खड्डा निर्माण होऊ लागला आहे.
या खड्ड्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो सध्या गाजत आहे. या फोटो सोबत… 40 टक्के कमिशन एकदम ओके! हा गर्भित संदेशही लक्षवेधी ठरत आहे. याखेरीज देखो देखो खड्डा आ गया, 24 अवर्स के बाद ही थर्ड गेट रोड पर खड्डा आ गया… यासारखे असंख्य कमेंट सदर फोटो पाहून व्यक्त केले जात आहेत.