सांबरा (ता. जि. बेळगाव) परिसरामध्ये लंपी स्कीन या संसर्गजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून गेल्या चार दिवसात केवळ एका सांबरा गावामध्ये तब्बल 8 जनावरे लंपीची शिकार झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेळगाव तालुक्यात लंपी रोगाची सुरुवातच पूर्व भागातून झाली होती. यापूर्वी मुतगा गावात लंपी स्किनने थैमान घातले होते. आता सांबरा गावात या रोगामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. या खेरीज परिसरातील कुडची, निलजी, मुतगा, बसरीकट्टी, शिंदोळी आधी गावांमधील बऱ्याच जनावरांना लंपीची लागण झाली आहे.
जनावरा लंपी स्किनमुळे जनावरे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना गाईला 20 हजार रुपये, वासरासाठी 5 हजार रुपये आणि बैलाला 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा शासनाने केली आहे.
मात्र आजारी जनावरांना वाचवण्यासाठीचा वैद्यकीय खर्च लाखोच्या घरात जात आहे. तसेच जनावरांच्या बाजारभावाच्या तुलनेत शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे ही नुकसान भरपाई वाढवून देण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
आता सांबरा गावात गेल्या चार दिवसात 8 जनावरे दगावल्यामुळे संबंधित जनावर मालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी लंपी रोगाची धास्ती निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान पश्चिम भागातही लंपी या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या जनावरांची संख्या वाढत आहे. अतिवाड येथे लंपीमुळे या आठवड्याभरात 3 बैलांचा नुकताच मृत्यू झाला.
सध्या उचगाव भागातील कल्लेहोळ, अतिवाड, बेकिनकेरे, बसूर्ते, तुरमुरी, गोजगे आदी गावातून लंपीची लागण झालेली जनावरे आढळत आहेत. ऐन सुगी हंगामाच्या तोंडावरच बैल दगावत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी अधिकच वाढल्या आहेत.