मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तर कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत बेळगावातील शेतकरी संघटनांनी आज जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्या ठिकाणी शेतकरी नेत्यांची निवेदन देण्यास आडकाठी आणणाऱ्या पोलिसांशी जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
उत्तर कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत आज शुक्रवारी बेळगावातील शेतकरी संघटनांनी राज्य सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन छेडले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यास आलेल्या मोर्चेकरी शेतकऱ्यांना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडविले. या पद्धतीने निवेदन सादर करण्यात आडकाठी आणल्यामुळे सिदगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावरून पोलीस अधिकारी आणि शेतकरी नेते यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. दरम्यान पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी देखील त्या ठिकाणी दाखल झाले.
त्यांनी प्रथम आपला पोलिसीखाक्या दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यासमोर त्यांना नमते घ्यावे लागले. तुम्ही इतरांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची मुभा देत आहात, मग लोकशाहीच्या मार्गाने अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आम्हा शेतकऱ्यांनाच का अडविले जात आहे? असा खडा सवाल शेतकरी नेत्यांनी केला. त्यामुळे अखेर पोलिसांना नमते घेऊन बॅरिकेड्स हटवावे लागले. त्यानंतर शेतकरी नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
प्रसार माध्यमांशी बोलताना सिदगौडा मोदगी म्हणाली की, उद्या एका खाजगी कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी मुख्यमंत्री बेळगावला येत आहेत. उसाला वैज्ञानिक दर मिळावा अशी मागणी यापूर्वी आम्ही निवेदनाद्वारे अनेक वेळा केली आहे. मात्र आजतागायत आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता बेंगलोर येथे साखर खात्याच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उसाचा दर ठरविण्यासाठी बैठक होणार आहे. मात्र या बैठकीला आमचा ठाम विरोध आहे. सदर बैठकी बेळगावातच झाली पाहिजे.
त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या बेळगाव भेटी प्रसंगी शेतकऱ्यांकडून निषेध नोंदविला जाणार आहे, प्रसंगी रस्तारोको आंदोलन देखील छेडले जाईल. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी उसाचा दर ठरवण्याबाबतची बैठक बेळगावात घेतली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे मन परिवर्तन केले पाहिजे असेही मोदगी यांनी स्पष्ट केले. यावेळी महिला शेतकरी नेत्या जयश्री गुरण्णावर यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना उत्तर कर्नाटकातील ऊस उत्पादकांवर अन्याय होत असल्याचे सांगून उसाचा दर ठरवण्याबाबतची बैठक बेळगावातच घेतली जावी अशी मागणी केली. याप्रसंगी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.