ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी सुरु केलेले उपोषण मंगळवारी देखील सुरूच राहिले असून उसाला प्रतिटन ५५०० रुपये एफआरपी दर निश्चित करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कायम ठेवली आहे.
सलग दुसरे दिवशीही सुरु असलेल्या या आंदोलनात साखर कारखानदारांनी उसाला ३५०० प्रति टन दर द्यावा तसेच राज्य सरकारने त्यात दोन हजार रुपयांची भर घालावी आणि उसाला एकूण साडेपाच हजार रुपये दर द्यावा अशी मागणी कायम ठेवली आहे.
राज्य रयत संघटना आणि हरित सेना यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आपले आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले असून सोमवारी रास्ता रोकोने सुरु झालेले आंदोलन मंगळवारी देखील सुरूच असल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी झालेली चर्चा फोल ठरली असून शेतकऱ्यांनी तब्बल २४ तास ठिय्या आंदोलन करत आपली मागणी उचलून धरली आहे.
सोमवारी दुपारी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून त्याचठिकाणी स्वयंपाक केला आणि आपले आंदोलन सुरु ठेवले.
मंगळवारी सकाळची डॉक्टरांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलक शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या ठोस आश्वासनाची मागणी केली.