श्री दुर्गामाता दौडमध्ये भगवा घेऊन धावणे हा मोठा बहुमान आहे, जो आज तुम्ही मला दिलात. भगवा हा केवळ ध्वज नाही, केवळ कपड्याचा तुकडा नाही तर असंख्य जिवांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले तेंव्हा हा भगवा फडकला आणि त्यासाठीच हा भगवा घेऊन आपण अव्याहातपणे ही जी दौड करत आहात त्यासाठी तुम्हा प्रत्येकाला मानाचा मुजरा, असे उद्गार सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.
सालाबाद प्रमाणे शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्रोत्सवाचा एक भाग असणाऱ्या श्री दुर्गामाता दौडच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते. शहरातील धर्मवीर संभाजी चौक येथे आज बुधवारी सकाळी हा समारंभ पार पडला. काल आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त येऊन देखील खास श्री दुर्गामाता दौडसाठी आज बेळगावात थांबलेले डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की 13 -14 वर्षांपूर्वी मी बेळगावात दौडच्या निमित्ताने आलो होतो. त्यावेळी बेळगावकरांनी मला जे प्रेम आणि आशीर्वाद दिले त्यावरून बेळगावचा कुंदा व मांड्यापेक्षा बेळगावची माणसं अधिक गोड आहेत याची काळजात खात्री पटली. आजच्या दौड मध्ये परमपूज्य भगवा घेऊन धावण्याचा फार मोठा बहुमान आपण मला दिला त्याबद्दल मी ऋणी आहे.
कारण भगवा हा केवळ फक्त ध्वज नाही. केवळ कपड्याचा तुकडा नाही. असंख्य जिवांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले, तेंव्हा हा भगवा फडकला आणि त्यासाठी आपण प्रत्येक जण ऋणी आहोत. त्याला स्पर्श करायला मिळणे भाग्याचं असतं. हा भगवा घेऊन आपण अव्याहत जी ही दौड करत आहात त्यासाठी तुम्हा प्रत्येकाला मानाचा मुजरा आहे. दौडसाठी लहान बालकांना त्यांच्या माता शिवरायांच्या वेशभूषेत तयार करतात, म्हणजे त्या एक प्रकारे शिवरायांचे संस्कार आपल्या मुलावर करत असतात.
जेंव्हा आपण जागतिक दृष्ट्या विचार करतो त्यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा अनेक मोठी साम्राज्य अस्तित्वात होती. परंतु संपूर्ण जगात 300 वर्षानंतर देखील ज्यांचे नाव घेतलं जातं की आपला ऊर अभिमानाने भरून येतो, मान ताठ होते, असे भाग्य केवळ एका राजाला लाभले ते म्हणजे छ. शिवाजी महाराज हे होत. त्यांचे संस्कार तुम्ही तुमच्या मुलावर करताय म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा असे सांगून आपल्या शिवप्रताप गरुड झेप या चित्रपटाविषयी डॉ. अमोल कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.
शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी समयोचित विचार व्यक्त करण्याबरोबरच डॉ अमोल कोल्हे यांनी शिवप्रेम आणि शिवप्रताप गरुड झेप चित्रपट असे शिवधनुष्य पेलेले असल्याचे सांगितले. या चित्रपटातील ऐतिहासिकप्रसंग प्रत्यक्ष लाल किल्ल्यातील त्या -त्या ठिकाणी जाऊन चित्रित केले असल्याचे सांगितले. बेळगावच्या श्री दुर्गा माता दौडबद्दल बोलताना करडे यांनी ज्या कोणाला हिंदुत्वाची धर्म पंढरी बघायची आहे त्यांनी आयुष्यात एकदा तरी बेळगावातील श्री दुर्गामाता दौडमध्ये सहभागी व्हावे, असेही स्पष्ट केले.
याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष किरण गावडे आदी सह अन्य पदाधिकारी आणि दौडमध्ये सहभागी शेकडो अबाल वृद्ध शिवभक्त उपस्थित होते. तरुणांवर देव, देश व धर्म यांचे संस्कार बिंबवणे आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या पिढीवर चांगले संस्कार व्हावे यासाठी करण्यात येणाऱ्या श्री दुर्गामाता दौडला आज सकाळी शहरातील मारुती गल्ली येथून प्रारंभ झाला. दौडमध्ये शेकडो धारकरी व शिवभक्तांनी सहभागी होऊन आपल्यातील जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले.
श्री मारुती मंदिर, मारुती गल्ली येथून सुरू झालेली आजची श्री दुर्गा माता दौड नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर बसवान गल्ली, देशपांडे गल्ली, बसवण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनसुरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खुट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकती वेस, कंग्राळ गल्ली मागील बोळ, सरदार ग्राउंड कॉलेज रोड (सन्मान हॉटेल), चन्नम्मा सर्कल, काळी आमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे समाप्त झाली.