शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव तर द्यावा या मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे आज उग्र आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव तर द्यावा यासह इतर अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे सम्राट अशोक चौक, किल्ला तलाव येथून आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
त्याचप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दर द्या, हालगा-मच्छे बायपास रद्द करा, विद्यूत खात्याचे खासगिकरण रद्द तसेच अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आहे. तत्पूर्वी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे जवळपास दोन तास धरणे सत्याग्रह करून निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली असहायता दर्शवताना अर्धनग्न अवस्थेत जमिनीवर लोळण घेऊन आमच्या मागण्याची पूर्तता करा अशी आर्त हाक सरकारला दिली.
शेतकऱ्यांच्या निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळाला पाहिजे या मताशी आपणही सहमत आहोत. मात्र उसाचा दर ठरवणे हे केंद्र आणि राज्य सरकारच्या हातात आहे असे सांगून एकंदर परिस्थिती पाहता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराच्या बाबतीत योग्य न्याय मिळेल यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 2000 ते 2500 रुपये दर देण्यात यावा, वीजपुरवठा मंडळाचे खाजगीकरण करू नये आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेने छेडलेल्या आजच्या आंदोलनात बहुसंख्य शेतकऱ्यांचा सहभाग होता.