येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा जवळील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर व सिग्नल बोर्ड बसवावेत अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे दुचाकीची धडक बसून एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी घडली. तेंव्हा संबंधित रस्त्यांवर त्वरित स्पीड ब्रेकर व सिग्नल बोर्ड बसवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे ग्रा. पं. सदस्यांनी व सर्व शाळांच्या शिक्षकानी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे नंदीहळ्ळी, देसुर आणि गर्लगुंजी येथून येणारी विटा, वाळूची वाहने फार वेगाने ये जा करत असतात.
यामुळे शालेय मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यामुळे येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा जवळील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व सिग्नल बोर्ड बसवण्याची मागणी केली होती. तत्पूर्वी या संदर्भात सहाय्यक कार्यकारी अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे काल मंगळवारी येळ्ळूरवाडी कन्नड शाळेतील इयत्ता पहिली मधील विद्यार्थी कु. विरेश शिवशंकर सूर्यवंशी याला एका भरधावात दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तो जखमी झाला आहे.
यापूर्वीही असे छोटे-मोठे अपघात झाले असून प्रशासन नेमके कधी जागे होणार? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. संबंधित खात्याच्या दुर्लक्षपणामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील तसेच गावकऱ्यांनी केली आहे.