मोठ्या प्रमाणातील खटल्यांमुळे बेळगावच्या एकमेव जिल्हा कौटुंबिक न्यायालयावरील ताण तर वाढला आहेच शिवाय जनतेचीही गैरसोय आहे. याची दखल घेऊन बेळगाव येथे आणखी एक कौटुंबिक न्यायालय तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या बेळगाव शहराच्या ठिकाणी आजतागायत फक्त एकच जिल्हा कौटुंबिक न्यायालय आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात जनतेची मोठी गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे सदर न्यायालयावरील कामाचा ताण देखील वाढला आहे.
वकील ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बेळगाव जिल्हा कौटुंबिक न्यायालयात तब्बल 2,600 हून अधिक खटले प्रलंबित आहेत. कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोट, पोटगी, रिकव्हरी, मुलांचा ताबा (जीएनडब्ल्यू) अधिक कौटुंबिक वादा संबंधीचे खटले चालतात. बेळगाव जिल्हा कौटुंबिक न्यायालयामध्ये तर दिवसाकाठी या पद्धतीच्या जवळपास 150 ते 200 खटल्यांची सुनावणी होत असते.
परिणामी या एकमेव न्यायालयावर मोठा ताण पडत आहे. न्यायालयात 2,600 हून अधिक कौटुंबिक वादाचे खटले प्रलंबित असल्यामुळे वादी प्रतिवादींसह वकील मंडळींनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याची गांभीर्याने दखल घेऊन बेळगाव येथे तात्काळ आणखी एक कौटुंबिक न्यायालय सुरू करून प्रलंबित खटले लवकरात लवकर निकालात काढले जावेत, अशी मागणी वकीलवर्गासह नागरिकांकडून केली जात आहे.