दिवाळीच्या रामनाथ मंगल कार्यालय येथे आर्ट्स सर्कल बेळगांव प्रस्तुत दिवाळी पहाट हा कार्यक्रम रसिकांच्या लक्षणीय उपस्थितीत साजरा झाला. गायक कलाकार होते पं. आनंद भाटे.
प्रारंभी सर्कलचे पदाधिकारी सदस्य रवींद्र माने यांनी कलाकारांचे आणि रसिकांचे स्वागत केले आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. गायक पं. आनंद भाटे ह्यांच्या साथीला तबल्यावर श्री. श्रीधर मांड्रे आणि संवादिनी श्री. मुकुंद गोरे हे होते. तानपुर्यावर श्रीमती अश्विनी गोरे-देशपांडे आणि श्री. श्रीवत्स हुद्दार हे होते.
पं. आनंद भाटे ह्यांनी प्रातःकालीन राग तोडीने आपल्या गायनाची सुरुवात केली. विलंबित एकतालातील ‘चंगे नैनोंवाली’ आणि द्रुत तीनतालातील ‘लंगर कंकरिये’ ह्या दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या.
त्यानंतर ‘पिया के मिलन की आस’ ही जोगिया रागावर आधारित ठुमरी त्यांनी सादर केली. मध्यंतरापूर्वी पं. भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेला ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा संत नामदेवांचा अभंग त्यांनी रंगवला.
मध्यंतरानंतर रवींद्र माने ह्यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. सर्कलच्या अध्यक्ष लता कित्तूर ह्यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला. पं.आनंद भाटे ह्यांनी पं. भीमसेन जोशी अविष्कृत ललत-भटियार हा जोडराग त्यांनी सादर केला. त्यामध्ये ‘ओ करतार’ आणि ‘जागो जागो प्यारे’ ह्या दोन्ही बंदिशी तीनतालात होत्या.
तद्नंतर त्यांनी ‘केतकी गुलाब जूही चंपक बन फूले’ ही बसंत-बहार रागातील द्रुत एकतालातील रचना सादर केली. संगीत मानापमान ह्या नाटकातील ‘खरा तो प्रेमा’, संगीत कान्होपात्रा नाटकातील ‘जोहार मायबाप जोहार’ आणि पं. भीमसेन जोशी ह्यांनी लोकप्रिय केलेली ‘जो भजे हरि को सदा’ ही भैरवी गाऊन त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
रसिकांनी कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने उपस्थिती दाखविली होती. रवींद्र माने ह्यांनी आभार प्रदर्शन केले.