बेळगाव शहरातील सिटी सर्व्हे ऑफिसमधील बेळगाव दक्षिणसाठी नियुक्त कामचुकार कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे जनतेला मनस्ताप देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची तात्काळ उचल बांगडी करून त्यांच्या जागी प्रामाणिक कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी, या माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केलेल्या तक्रार वजा मागणीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून उद्या बुधवारी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन चौकशी केली जाणार आहे.
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी अलीकडे पाच दिवसांपूर्वी सिटी सर्व्हे ऑफिसमधील बेळगाव दक्षिणसाठी नियुक्त भूमापक प्रवीण कुलगोड आणि अन्य एक कर्मचारी कोटी यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. सदर कर्मचारी घेऊन दिलेले काम करण्यात चालढकल करून जनतेला विनाकारण त्रास देतात. कोरवी गल्ली अनगोळ येथील सी.एस.नं. 4688 या जागेवर पुन्नाप्पा मल्लाप्पा वाजंत्री, प्रकाश मल्लाप्पा वाजंत्री आणि लक्ष्मण मल्लाप्पा वाजंत्री यांची नावे चढवण्याची आहेत. तेंव्हा सीटीएस नंबर कार्ड ओपन करून ही नावे चढवावीत अशी माझी विनंती आहे.
हे काम करून देण्यासाठी चालढकल केली जात असल्यामुळे मला वारंवार सिटी सर्व्हे ऑफिसचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. याबाबत मी एडीएलआर बेळगाव यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांनी तात्काळ सिटी सर्व्हे ऑफिसमधील दक्षिणचे कर्मचारी प्रवीण कुलगोळ आणि कोटी यांना माझे काम तात्काळ करून देण्याची सूचना केली होती. मात्र तरीही माझे काम आजतागायत करून देण्यात आलेले नाही.
संबंधित कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांमुळे कर्नाटक शासनाची प्रतिमा डागाळत आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना नाहक त्रास -मनस्ताप देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची तात्काळ उचल बांगडी करून त्यांच्या जागी प्रामाणिक कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या तक्रारीत नमूद होता.
या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांचे पदसिद्ध तांत्रिक सहाय्यक आणि भूमी अभिलेख उपसंचालक यांनी प्रवीण कुलगोड व कोटी यांना उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांना देखील त्याप्रसंगी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान अनगोळच्या कोरवी गल्ली, बजंत्री गल्ली, वड्डर गल्ली, कुरबर गल्ली या भागातील जास्तीत जास्त लोक मागासवर्गीय आहेत. मराठी आणि कानडी भाषिक अशी संमिश्र वसाहत या ठिकाणी आहे. सरकारने जाहीर केलेल्या आंबेडकर आवास योजना, अटल बिहारी योजना वगैरे योजना व सुविधा मिळण्यासाठी या लोकांना फार त्रास होत आहे. कारण सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हे सरकारी काम असल्याकारणाने त्यासाठी प्रॉपर्टी कार्ड ओपन होणे फार जरुरीचे असते.
त्यामुळे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या विनंतीनुसार कोरवी गल्लीतील जागेवर पुन्नाप्पा, प्रकाश आणि लक्ष्मण वाजंत्री यांची नांवं चढवण्यासाठी सीटीएस नंबर कार्ड ओपन झाल्यास त्याचा फायदा उपरोक्त भागातील सर्व लोकांना होणार आहे.