बेळगाव शहरातील वाहतूक अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली असून वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी शहरांतर्गत विविध ठिकाणी चार उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मात्र या चारही उड्डाणपुलाच्या संदर्भातील अनेक अडचणी सुरुवातीपासूनच समोर आल्या असून या उड्डाणपुलाच्या कामकाजावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कपिलेश्वर ओव्हर ब्रिज, छत्रपती शिवाजी महाराज ओव्हर ब्रिज, गोगटे सर्कल ओव्हर ब्रिज आणि काल-परवा उद्घाटन करण्यात आलेला तिसऱ्या रेल्वेगेट नजीकचा ओव्हर ब्रिज हे चारही ब्रिज “असून अडचण नसून खोळंबा” अशा पद्धतीने उभारण्यात आले आहेत.
प्रत्येक उड्डाणपुलाच्या दर्जावर नागरिकांनी प्रशचिन्ह उभे केले असून या उड्डाणपुलांवर असलेले खड्डे, अंधाराचे साम्राज्य आणि दर्जाहीन कामकाज यामुळे या उड्डाणपुलांवरून मार्गस्थ होताना नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे.
आधीच संथगतीने होणारी उड्डाणपुलाची कामे, त्यात उद्घाटनासाठी लागणारा विलंब आणि यादरम्यान नागरिकांची होत असलेली गैरसोय याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट आहे. शहरातील या चारही उड्डाणपुलाचे काम अलीकडेच पूर्ण झाले असून या उड्डाणपुलाची झालेली दुरवस्था पाहता वर्षानुवर्षे हे उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत असल्याचा भास होत आहे.
श्री गणेशोत्सवादरम्यान या उड्डाणपुलांवरील समस्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील सादर करण्यात आले होते. उड्डाणपुलावर पसरलेला अंधार, बंद अवस्थेतील पथदीप, खड्डे, पावसामुळे खड्ड्यात साचणारे पाणी या साऱ्या परिस्थितीतून वाहनचालकांना सदर उड्डाणपुलांवरून मार्गस्थ व्हावे लागत होते. या उड्डाणपुलांचे कामकाजदेखील अत्यंत संथगतीने पूर्ण करण्यात आल्याने आधीच संतापलेल्या नागरिकांकडून प्रशासनाच्या नवे बोटे मोडली जात आहेत.
बुधवारी बेळगावमधील तिसऱ्या रेल्वे गेट नजीक असलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी आणि विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र उदघाटनाच्या दुसरे दिवशी या उड्डाणपुलावरील खड्ड्याचा फोटो तुफान वायरल झाला असून सोशल मीडियावर यावरून प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली जात आहे. ऊन-पाऊस आणि विविध अडचणींमधून उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम महिन्यानंतर उलटले मात्र उदघाटनाच्या दुसऱ्याच दिवशी या उड्डाणपुलाच्या दुरवस्थेबाबत तक्रारींचा महापूर पाहायला मिळाला.
शहराचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेले उड्डाणपूल बेळगावकरांच्या सेवेत दाखल झाले खरे! मात्र वरून आकर्षक दिसणाऱ्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या या उड्डाणपुलांच्या दर्जाबाबत मात्र मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.