सध्या कालपासून परतीचा पाऊस ओसरला असून दिवाळीत थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. आज सोमवारी पहाटे शहर परिसरात पडलेल्या गुलाबी थंडीने तर हिवाळ्याच्या मोसमाला सुरुवात झाल्याची जणू नांदीच दिली आहे.
परतीचा पाऊस ओसरल्यानंतर शहरात थंडीने पदार्पण करण्यास सुरुवात केली असून आज पहाटे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या लोकांनी आणि मॉर्निंग वॉकर्सनी शहर परिसरात गुलाबी थंडीचा आनंद घेतला. पहाटे पडलेल्या थंडीनंतर आज सकाळपासून सूर्यप्रकाश असला तरी हवेत काहीसा गारठा जाणवत आहे.
थंडीमुळे शहराचे तापमान घसरले आहे. आज सोमवारी सकाळी कमाल तापमान 28.1 अंश सेल्सिअस तर किमान 12.4 अंश सेल्सिअस इतके होते. पहाटे थंडी बरोबरच कांही ठिकाणी धुके पडण्यास सुरुवात झाली आहे.
एकंदर बेळगाव शहरात थंडीच्या मोसमाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता रेनकोट छत्र्या पुन्हा अडगळीत गेल्या असून ठेवणीतील गरम कपडे बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी फिरावयास बाहेर पडणाऱ्यांच्या अंगावर गरम कान टोप्या, स्वेटर, जॅकेट, मफलर आणि महिलांच्या अंगावर शाली दिसू लागले आहेत.
दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांमध्ये शहरात गुलाबी थंडी असते खास 20 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीमध्ये तर कडाक्याची थंडी पडते. तेंव्हा आता लवकरच शहर उपनगरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्याची चित्र पहावयास मिळणार आहे. दरम्यान बेळगाव विमानतळ येथील तापमान केंद्रात या मोसमातील सर्वाधिक तापमान 29.2 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते.
त्याचप्रमाणे यापूर्वी सर्वात कमी म्हणजे किमान तापमान गेल्या 22 जानेवारी 1984 रोजी 6.4 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले होते, तर सर्वाधिक 47 अंश सेल्सिअस तापमान 2010 साली नोंदविले गेले होते. आता या मोसमात थंडी आपला काय प्रताप दाखवेल हे पहावे लागणार आहे.