जनसंपर्क यात्रेदरम्यानच दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली जाईल त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.
विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आज बेळगाव दौऱ्यावर आले असताना सांबरा विमानतळावर पत्रकारांची वार्तालाप करताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. यावेळी तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता तुम्ही फक्त पहात रहा. तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत संकल्प यात्रा घेऊन मी लवकरच दिल्लीला जाणार आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेणार आहे. काय निर्णय होईल ते तुम्हाला कळलेच असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरातील श्री कनेरी मठातील कन्नड भवनाला शिवसेनेने विरोध केला होता. त्यावर बोलताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कन्नड भवन आहेत. हे काही नवीन नाही देवस्थानमध्ये भवन निर्माण करताना त्यामध्ये भाषा किंवा जातीभेद केला जाऊ नये असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
भारत देश एकीने बलवान होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला कांहीच अर्थ उरलेला नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. भारत जोडो याचा अर्थ काय? भारत हा एकसंधच आहे आणि तो बलवानही होत आहे. ही वस्तुस्थिती असताना भारत जोडो मोहिमेचा उपयोगच काय? असेही त्यांनी नमूद केले.
*काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न*
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह विविध मान्यवरांचे आज सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न कांही दलित संघटनांकडून करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांचे सांबरा विमानतळावर आगमन होताच बैलहोंगलचे डीएसपी शिवानंद कटगी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी दलित संघटनांनी धरणे आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा खबरदारीचा उपाय म्हणून काळे झेंडे दाखवणाऱ्या दलित संघटनेच्या 10 हून अधिक नेते व कार्यकर्त्यांना मारिहाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.