1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव दिन आणि मराठी भाषिकांकडून पाळला जाणारा काळा दिन याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अभाधीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहर व उपनगरातील संवेदनशील व अति संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत.
गेल्या 66 वर्षापासून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांतर्फे दरवर्षी 1 नोव्हेंबरला काळा दिन पाळला जातो. या दिवशी केंद्र सरकारच्या निषेधार्थ मूक सायकल फेरी काढण्याबरोबरच जाहीर सभा घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाते.
मात्र अलीकडे कांही वर्षापासून जिल्हा प्रशासनाच्या मदतीने याच दिवशी राज्योत्सव मिरवणुकीचे आयोजन केले जात आहे. या मिरवणुकीत नियम धाब्यावर बसून कन्नड कार्यकर्ते नंगानाच करतात. साऊंड सिस्टिम वापरण्यावर बंदी असली तरी छाती धडकी भरेल अशा पद्धतीने आवाज ठेवून नंगानाच करत मिरवणूक काढली जाते. इतकेच नव्हे तर शांततेत फेरी काढणाऱ्या मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक दिवस याचा प्रयत्नही केला जातो.
त्या पद्धतीने यावेळी शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून भाषिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहर उपनगरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
यासाठी ठीकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. या माध्यमातून शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.