रहदारीचा रस्ता असलेल्या मुख्य अनगोळ क्रॉस येथील नव्या स्मार्ट बस स्टॉपचा सध्या मोकाट जनावरे आणि एका कॅन्टीन चालकाने ताबा घेतल्यामुळे हा बस स्टॉप नेमका आहे तरी कोणाच्या सोयीसाठी? असा संतप्त केला जात आहे.
रहदारीचा रस्ता असलेल्या मुख्य अनगोळ क्रॉस येथे नव्याने उभारण्यात आलेला स्मार्ट बस स्टॉप सध्या मोकाट जनावरांचे आश्रय स्थान बनला आहे. हे कमी होते म्हणून की काय अतिक्रमण करून या बस स्टॉपमध्ये चक्क एक फास्ट फूड कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बसची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना बहुतांश वेळा स्टॉप सोडून रस्त्यावरच ताटकळत थांबावे लागते.
गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्ट बस स्टॉपमध्ये तळ ठोकणारी मोकाट जनावरे आणि कॅन्टीनमुळे बस स्टॉपच्या आसपास अस्वच्छताही पसरत आहे. त्यामुळे हा बस स्टॉप नेमका कोणत्या उद्देशाने कोणासाठी उभारण्यात आला आहे? असा संतप्त सवाल केला जात आहे. सध्या सदर बसस्टॉप नागरिकांसाठी सोयीचा ठरण्याऐवजी अधिकच गैरसोयीचा झाला आहे.
या पद्धतीने फास्ट फूडचे गाडे आणि मोकाट जनावरे येऊन बस स्टॉपची जागा कब्जा करू लागले तर प्रवाशांनी थांबायचे कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील भटक्यात जनावरांची संख्या वाढली असून त्यांना कोंडवाड्यात घालून त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या बस स्टॉपच्या ठिकाणी फास्ट फूडचे गाडे लावणाऱ्यांना सक्त ताकीद देऊन कोणत्याही बसस्थानकावर अशाप्रकारे गाड्या लावू नये असे सांगण्यात यावे.
जेणेकरून प्रवाशांना अगदी बिनधास्त बसस्थानकावर थांबण्यास जागा प्राप्त होईल आणि प्रवाशांची गैरसोय सुद्धा होणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. तरी बेळगाव महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.