बेळगाव लाईव्ह विशेष : आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही देशव्यापी ‘भारत जोडो’ पदयात्रा आयोजित केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली भारत जोडो पदयात्रा देशभरात प्रचार करत आहे. राहुल गांधी यांनी सुरु केलेली हि पदयात्रा गुरुवारी मंड्या येथे पोहोचली. या पदयात्रेत सोनिया गांधी देखील सहभागी झाल्या. कर्नाटकात पोहोचलेल्या या पदयात्रेसाठी बेळगावमधील काँग्रेस नेतेही सहभागी होण्यासाठी रवाना झाले.
बेळगावमधून या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीदेखील पदयात्रेत सहभाग घेतला. दरम्यान या पदयात्रेत प्रचार करताना सोनिया गांधी यांनी डॉ. अंजली निंबाळकरांचा हात हातात घेतला. छायाचित्रकारांनी नेमका हाच क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला. आणि बेळगावच्या राजकीय गोटात हीच चर्चा दिवसभर रंगू लागली.
खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतच हातात हात घातलेला फोटो सोशल मीडियावर दिवसभरात तुफान वायरल झाला असून काँग्रेस चौकटीबाहेर येऊन काम करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही वर्षात काँग्रेसचे झालेले खच्चीकरण आणि यातून मार्ग काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेली भारत जोडो पदयात्रा यातून काँग्रेस पुन्हा मूळ मार्गावर येण्याची सकारात्मक चिन्हे दिसू लागली आहेत. कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि विविध राज्यातील भागात सुरु असलेल्या पदयात्रेला मिळणारा पाठिंबा यामुळे काँग्रेस पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
७ सप्टेंबर पासून सुरु झालेली भारत जोडो पदयात्रा ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास करणार असून या पदयात्रेच्या माध्यमातून दहशतीच्या राजकारणाला आणि सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या, बेरोजगारी, विषमता वाढविणाऱ्या अर्थव्यवस्थेला पर्याय मिळेल असे सांगण्यात येत आहे. जात, धर्म, अन्न आणि भाषेच्या मुद्द्यावरून सुरु असलेले राजकारण यामुळे राज्ये कमकुवत होत असून, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात आले आहेत.
या सर्व आव्हानांना तोंड देत पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी आगेकूच करणाऱ्या काँग्रेसच्या बेळगावमधील जागांसाठी उमेदवारीवर शिक्कामोर्तब तर झाले नाही ना? अशीही चर्चा आजच्या सोनिया गांधी आणि अंजली निंबाळकर यांच्या फोटोवरून रंगलेली पाहायला मिळाली.