शिवसेनेत आजवर कधीही नव्हती इतकी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे खरी शिवसेना कुणाची अशी आवई उठवत शिवसेनेच्या गळ्यालाच नख लावण्याची भूमिका काही जणांनी घेतली आहे.56 वर्षाचा वारसा असलेल्या शिवसेनेला जखमी करून जागेवरच खिळवून ठेवण्याची खेळी भाजपने खेळली आहे.शि सेनेतील बिनीचे शिलेदार साम दाम आणि दंडाने फोडून शिवसेनेच्याच विरुद्ध उभा केलेले आहेत.
संघर्षातून उभारलेली शिवसेना आजवरच्या शिवसेनेच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या संघर्षाला तोंड देत आहे या पाश्वभूमीवर बेळगावचा मराठी माणूस मूळ शिवसेनेच्या पाठीमागे आहे आपला हा निर्धार दाखवण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहेत.विजयादशमी दसऱ्यानिमित्त महाराष्ट्रात मुंबई येथे आज बुधवारी होत असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला बेळगाव सीमा भागातील अनेक मराठी भाषिक मुंबईला रवाना झाले आहेत.
मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोघांचा वेगवेगळा दसरा मेळावा होत आहे. यानिमित्ताने राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे. एकंदर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची आतुरता शिगेला पोहोचली आहे.
बेळगाव सीमा भागातूनही अनेक शिवसैनिक शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. यापैकी प्रीतम पाटील, योगेश पाटील, व गणेश आपटेकर हे शिवसैनिक आज बुधवारी सकाळीच शिवतीर्थावर पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. या तिघांकडील हिंदुहृदय सम्राट शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ‘साहेब’ असा उल्लेख असलेले आणि ‘शिवसेनेवर असला जरी गद्दारांचा संकट गंभीर बेळगावचा निष्ठावंत शिवसैनिक सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत खंबीर… काळ कसोटीचा आहे पण वारसा संघर्षाचा आहे’ असा मजकूर असलेले बॅनर साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
महाराष्ट्रातील शिवसेने विषयी बेळगावातील जनतेला खूप आकर्षण आहे. बेळगावात मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत. आता महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे गट पडले आहेत. तथापि बेळगावातील मराठी जनता व शिवसैनिकांची पसंती मात्र उद्धवजी ठाकरे यांनाच आहे. हे बेळगावच्या प्रीतम पाटील, योगेश पाटील, व गणेश आपटेकर या शिवसैनिकांच्या बॅनर वरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.