नेहमीच कोणत्या ना कोणत्या पद्धतीने नुकसान झेलणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील समस्यांची रांग संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टी, पूर यासारख्या समस्या तर नेहमीच्या आहेतच पण आता पिकांवर ‘करपा’चे संकट ओढवले आहे.
बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीने पीकं गेली तर उर्वरित भागातील भातपीकं जोमात होती. पण आता बासमती, इंद्रायणी तसेच इतर भातपीकांवर करपा रोग पडण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना आता मोठी चिंता सतावू लागली आहे. कारण हा रोग जोरात फैलावत सर्वच भातपीकं नष्ट होत असल्याने पोटापूरते तरी भात मिळेल कि नाही याचीच चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
बहुतांशी लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. बेळगावमध्ये प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते. वारंवार भेडसावणाऱ्या समस्यांमुळे भाताची उत्पादकता कमी झाली असून ती वाढविण्यासाठी अधिक उत्पन्न देणारे भाताचे पीक, रासायनिक, जैविक – सेंद्रिय खतांचा योग्य वापर याचप्रमाणे कीड आणि रोगापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पीक संरक्षणासाठी एकात्मिक उपाययोजना करणेही आवश्यक आहे.
करपा या रोगाचे संकट शेतकऱ्यांवर ओढावल्याने शेतकरी अधिक चिंतेत सापडला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यातून उरलेसुरले-हातातोंडाशी आलेले भातपीक निसटून जाईल कि काय अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
कृषी विभागाकडून या रोगावरील औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.