पावसाळा संपत आला असे वाटत असताना आज सोमवारी सकाळपासून बेळगाव शहर उपनगरासह तालुक्यात पुन्हा पावसाचा कहर सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बेळगाव शहर परिसरात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे, जणू काही मान्सूनची सुरुवात झाली आहे की काय? असे वातावरण शहर आणि तालुक्यात निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस यामुळे भर दुपारी हवेत गारठा निर्माण झाला आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेड यांचा अनागोंदी कारभार तर सर्वश्रुत आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा बोजवारा कसा उडवण्यात आला आहे याची प्रचिती सध्या पडत असलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुनश्च येऊ लागली आहे. पाण्याच्या निचऱ्याअभावी गटारी तुंबल्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली जात असल्याचे पहावयास मिळत आहे. कचरा व सांडपाणी रस्त्यावर वाहू लागल्यामुळे त्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याची चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. अर्धवट अवस्थेतील विकास कामे आणि ज्या ठिकाणी स्वच्छतेची कामे करण्यात आलेली नाही त्या परिसरांना सध्या चिखलाच्या दलदलीसह बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळत आहे.
मुसळधार पावसामुळे शहरातील बाजारपेठेवर देखील मोठा परिणाम झाला आहे. जोरदार पाऊस आणि सर्वत्र पाणीच पाणी यामुळे बाजारपेठेतील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. एकंदर शहरातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झालेले पहावयास मिळत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत असताना त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे कर भरून देखील जोरदार पाऊस झाल्यास शहरात निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन अद्यापही कोणतीच ठोस कार्यवाही करत नसल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.