नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने बेळगावच्या बी. ई. सोसायटी संचलित मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुचेता उदय कुलकर्णी यांना आंतरराज्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
शहरातील धर्मनाथ भवन येथे उद्या शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. तीन राज्यातील मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. प्रा. डॉ. सुचेता कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एमए अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यानंतर पत्रकारीता आणि क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयांमधील अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
कॅनडा येथील रिचमंड युनिव्हर्सिटीचा शैक्षणिक व्यवस्थापनाचा तीन महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रा. डॉ. सुचिता यांना टोंगा विद्यापीठाची पीएचडी पदवी लाभली आहे. यापूर्वी त्यांनी मुंबईसह बेळगाव येथील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जबाबदारीची पदं भूषवली आहेत. विविध संघ संस्थांच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात देखील आघाडीवर असतात.
प्रा. डॉ. सुचेता कुलकर्णी यांना यापूर्वी रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम संस्थेतर्फे आदर्श शिक्षिका, कल्पवृक्ष फाउंडेशनचा पुरस्कार यासह विविध संस्थांकडून उत्कृष्ट प्राचार्य म्हणून सन्मान लाभला आहे.
अकॅडमी एज्युकेशनल लीडरशिप अवॉर्ड हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. याखेरीस यंदाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेल्सन मंडेला ग्लोबल ब्रिलियन्सि अवार्ड हा पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. आता आंतरराज्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.