शहापूर छ. शिवाजी उद्यानातील शिवसृष्टी तात्काळ जनतेसाठी खुली करा अन्यथा शिवभक्त आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना नाईलाजाने ती शिवसृष्टी सर्वांसाठी खुली करावी लागेल, असा इशारा देत श्रीराम सेना हिंदुस्तानने शिवसृष्टी खुली करण्यासाठी प्रशासनाला 10 दिवसांची मुदत दिली आहे.
शहापूर छ. शिवाजी उद्यान येथील शिवकालीन इतिहास सांगणारी हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छ. शिवाजी महाराज यांच्यासह त्यांचे पराक्रमी सहकारी आणि मावळ्यांचे पुतळे असणारी शिवसृष्टी गेले अनेक वर्ष बंदावस्थेत आहे. ही शिवसृष्टी जनतेसाठी खुले व्हावी यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्तानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर म्हणाले, शहापूर छ. शिवाजी उद्यानातील शिवसृष्टीचे 2017 साली रीतसर उद्घाटन झाले आहे.
त्याप्रसंगी तत्कालीन महापौर संज्योत बांदेकर, जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, माजी महापौर संभाजी पाटील, खासदार सुरेश अंगडी, संजय पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी जयराम तसेच बुडा आयुक्तांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. मात्र उद्घाटनानंतर अल्पावधीत ही शिवसृष्टी बंद करण्यात आली.
तेंव्हापासून आजतागायत बंद असलेली ही शिवसृष्टी जनतेसाठी खुली करावी या मागणीचे निवेदन आम्ही गेल्या 16 सप्टेंबर रोजी प्रशासनाला सादर केले होते. तसेच त्यासाठी एक महिन्याची मुदतही दिली होती. तथापि राजकीय स्वार्थापोटी आणि आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून त्या हिशोबाने छ. शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी खुली करण्याचा घाट बेळगाव दक्षिणच्या आमदारांनी रचला आहे. आपण आपल्या घराची अथवा वास्तूची एकदाच वास्तुशांती अथवा उद्घाटन करतो, ते दोन दोनदा होत नाही आणि ही शिवसृष्टी तर आपली आस्था आणि अस्मिता आहे. आमच्या आई-वडिलांपेक्षा ती आम्हाला श्रेष्ठ आहे. आम्हाला धर्मापेक्षा छ. शिवाजी महाराज श्रेष्ठ वाटतात. शिवरायांना बंदीवासात ठेवणे बादशहा औरंगजेबाला देखील शक्य झाले नाही. मात्र आज कांही हिंदुत्ववादी राजकारणी लोक शिवरायांना शिवसृष्टीत बंदिस्त ठेवून त्यांचा अपमान करत आहेत. तेंव्हा आमची एकच मागणी आहे की 2017 साली उद्घाटन झालेली शिवसृष्टी जनतेसाठी तात्काळ खुली करण्यात यावी असे सांगून त्यासंदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, बुडा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहोत, अशी माहिती कोंडुसकर यांनी दिली.
आम्ही निवेदन दिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आमचं ठरलं आहे असे म्हणून योगी आदित्यनाथजी यांचा फोटो घातला. मात्र त्यांनीही भान ठेवावं की शिवसृष्टीचे उद्घाटन झालेले आहे. शिवसृष्टी बंद अवस्थेत ठेवणे हा छ. शिवाजी महाराजांसह योगी आदित्यनाथजी यांचाही अपमान आहे.
त्याचप्रमाणे दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणीही छ. शिवाजी महाराजांचा अवमान करू नये अशी माझी विनंती आहे, असेही रमाकांत कोंडुसकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.