लंपी स्किन या संसर्गजन्य रोगामुळे अनेक गाई मृत्युमुखी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर गरीब गरजू शेतकऱ्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल (एफएफसी) या सेवाभावी संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या गाईंसाठी मोफत पौष्टिक दर्जेदार खाद्य वितरित केले जाणार आहे. फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नवराम चौधरी, जितेंद्र लोहार, किरण निप्पाणीकर व मंदार कोल्हापुरे हे हा उपक्रम राबवत आहेत. तरी या उपक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरजू शेतकऱ्यांनी 9986809825 या क्रमांकावर संतोष दरेकर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच शहरवासियांनी देखील जनावरे मृत्युमुखी पडल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपल्यापरीने शक्य होईल तितकी मदत करावी, असे आवाहन एफएफसीने केले आहे.
लंपी स्किन रोग : लंपी स्किन डिसीज (एलएसडी) हा जनावरांना होणारा संसर्गजन्य रोग असून जो पाॅक्सीव्हायरिड कुळातील विषाणूमुळे होतो. ज्याला निथलिंग विषाणू म्हटलं जातं. जनावरांना ताप येणे, त्यांच्या शरीरावरील त्वचेवर लसिका गाठी आणि एकाधिक गाठी (2 ते 5 सें. मी. व्यासाच्या) येणे.
तसेच श्लेष्मल त्वचा, अन्ननलिकेत व श्वासोच्छ्वासात त्रास होणे, ही या रोगाची लक्षणे आहेत. रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या पायांमध्ये अंतर्निहित सुज येऊन ती लंगडेपणा दाखवतात.
या रोगामुळे जनावरांची त्वचा कायमची खराब होत असल्यामुळे बाजारात त्यांची किंमत कमी होऊन पशुपालकाला आर्थिक फटका बसतो. या खेरीज लंपी स्कीनमुळे जनावरांमध्ये तीव्र दुर्बलता निर्माण होऊन दूध उत्पादन घटणे, वाढ खुंटणे, वंधत्व येणे, गर्भपात आणि काही वेळेला जनावराचा मृत्यू असे प्रकार घडतात.