बेळगाव पोलीस आयुक्तालय आणि विविध सरकारी खात्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुलांची सुरक्षितता’ या विषयावरील कार्यशाळा आज बुधवारी केएलई जिरगे सभागृहामध्ये यशस्वीरित्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.
शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत मुलांची सुरक्षितता, पोक्सो कायदा, अलीकडेच प्रसिद्ध होत असलेल्या मुले पळविण्याच्या बातम्या, त्याचप्रमाणे इतर गुन्हेगारीपासून मुलांना सुरक्षित ठेवणे या खेरीज पालक, शिक्षक आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी याबाबत महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी मार्गदर्शन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी यांनी मुलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याबाबत विचार व्यक्त केले.
जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) बसवराज मलतवाडआणि बेळगाव शहराचे बीईओ वाय. जे. बजंत्री यांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळा मुख्याध्यापकांनी घ्यावयाचे क्रम याबाबत तर केएसआरटीसी डीसी व्ही. वाय. नाईक आणि आरटीओ शिवानंद मगदूम यांनी मुलांना रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबतीत कसे जाणकार बनवावे. त्या अनुषंगाने पालक व शिक्षकांची जबाबदारी, यासंदर्भात मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
या पद्धतीने कार्यशाळेमध्ये विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी मुलांच्या सुरक्षततेच्या दृष्टीने त्यांच्या खात्याने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती विशद केली. प्रारंभी बाल कल्याण खात्याच्या नोडल अधिकारी व पोलीस उपायुक्त स्नेहा पी. व्ही. यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. शिक्षण खात्याशी संबंधित समस्या आणि आरोग्य खात्याने हाती घ्यावयाचे क्रम याबाबत देखील कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
कार्यशाळेस बेळगाव शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेबळी, महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी जे. टी. लोकेशकुमार यांच्यासह बेळगाव महापालिका, आरोग्य खाते, वन खाते, केएसआरटीसीचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, एसडीएमसी सदस्य, सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, मुख्य शिक्षक, बेळगाव शहरातील सर्व एसीपी, पीआय, पीएसआय आणि सर्व पोलीस ठाण्यांचे बाल कल्याण अधिकारी तसेच अन्य संबंधित मंडळी उपस्थित होती.