कर्नाटक राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे होण्याची शक्यता कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी वर्तवली आहे. मागील वर्षी 2021 मध्ये बेळगावमध्ये दहा दिवस चाललेले हे अधिवेशन 24 डिसेंबर रोजी समाप्त झाले होते.
गेल्या वर्षी पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाची बिलं अद्यापही हॉटेल चालकांना मिळालेली नाहीत. हॉटेल चालकांची बिले 30 दिवसात अदा केली जातील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आजतागायत प्रलंबित बिलाच्या 50 टक्के बिल तेही कांही मोजक्या जणांना मिळाले आहे. हॉटेल चालकांसाठी 2018 मधील प्रचलित दर 2021 सालासाठी कायम ठेवण्यात आले होते. मात्र तरी देखील आजपर्यंत बीलं अदा झालेली नाहीत.
बेंगलोर येथील 10 दिवसांच्या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकारांशी बोलताना सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी बेंगलोर येथील 10 दिवसाच्या अधिवेशनात सदस्यांची 99 टक्के हजेरी होती. अधिवेशनाच्या दहा दिवसाच्या कालावधीत 52 तास आणि 14 मिनिटे इतके अधिवेशनाचे कामकाज चालले होते. यादरम्यान 14 विधेयकांना मंजुरी देण्यात आली असे स्पष्ट केले. सभापतींनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 15645 जणांनी निमंत्रितांच्या गॅलरीमधून अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव घेतला. आमदार रमेश जारकीहोळी यांनी सभापतींना कल्पना न देता या दहा दिवसाच्या अधिवेशनाला गैरहजर राहून बुट्टी मारली होती.
बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाची निश्चित तारीख सांगण्यास नकार देऊन आपण बेळगावला भेट देणार आहोत त्यानंतर अधिवेशनाची तारीख जाहीर केली जाईल. जी बहुदा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील असेल असे सभापतींनी सांगितले.
त्यामुळे एकदा का तारीख जाहीर झाली की त्यानंतर लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल्स आरक्षित केली जाणार आहेत. तेंव्हा अधिवेशनाच्या काळात बेळगावला भेट देणाऱ्या पाहुण्यांना शहरातील बहुतांश हॉटेल्स बाहेर खोल्या रिकामी नसल्याचे हाउसफुल्लचे फलक पहावयास मिळणार आहेत.