त्याच्या गळ्यातील घुंगरू आता स्तब्ध झाले होते.पायरव थांबला होता त्याचे तिथले अस्तित्व काही सुनं झालं होतं. दररोज त्याच्या अस्तित्वाच्या खुणा घरभर अल्हाददायक वातावरण निर्माण करणाऱ्या होत्या. तोच नाग्या आज धाराशाही झाला होता.
त्याने शर्यतीत मिळवलेल्या शेकडो ढाली आणि कप भिंतीच्या छातीचीशोभा वाढवत होते., त्या भिंती आज उदास झाल्या होत्या. त्याच्या आठवणीने सगळ्यांच्या मनातले कड डोळ्यावाटे वाहत होते.दुःख कसे आवरावे हे कुणालाही समजत नव्हते. कारभार गल्ली वडगाव येथील शेतकऱ्याच्या कुटुंबाचा एक धागा, पाखरे कुटुंबाचा नाग्या आज राहिला नव्हता.
दहा जणांच्या कासऱ्याला न आवरणारा नाग्याचा कासरा आज ढिला पडला होता. येसनीला हरवाळ असणारा नाग्या आता उठणार नव्हता. नाग्याची दौड थांबली अन पाखरेंच्या घरातला गुलाल हरवला. शर्यतीच्या मैदानात खुरा बरोबर उडणाऱ्या धुरळ्यात पाखरे कुटुंबाने शेकडो वेळा गुलालाची होळी खेळली होती.फज्जाला गवसणी घालणाऱ्या नाग्याचे ढिगाने बक्षिसाची लयलूट केली होती. त्याच्या आठवणीनं मारुती राव आणि पाखरे कुटुंबियांच्या चरचरत्या डोळ्यातून नागेशची आठवण सांडत होती.बाया बापडया बेंदरांचा उंडा नांग्याच्या तोंडाला लावलेला आटव काढून पदराचा शेव ओला करत होत्या.
बैलाच्या पायाची भिंगरी ज्यावेळी शर्यतीच्या मैदानात वारं होऊन धावते.,त्यावेळी मालकाचा जीव फेट्याच्या शेमल्यावर नाचत असतो. त्याचा अभिमान, स्वाभिमान बैलाच्या शिंगावर तरंगत असतो. असा जीव लावलेला जीव आपल्यातून निघून जातो त्यावेळी शेतकऱ्याच्या मनाचा बांध फुटतो आणि डोळ्यातील अश्रू वहायला लागतात.आज कारभार गल्ली वडगाव येथील अख्या गल्लीला दुःख सागरात लोटून नाग्या वेगळ्या शर्यतीसाठी निघून गेला.
कारभार गल्ली येथील मारुती पाखरे यांनी 21 वर्षांपूर्वी अंकलीचा बाजारांमधून आणलेला नाग्या बैल शर्यतीसाठी त्यांनी तयार केला आणि त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये शेकडो शर्यती जिंकत बक्षीसं मिळवली होती.
सलग तीन शर्यती जिंकल्या की हिंदकेसरीची बिरदावली मिळते तशी या नाग्या बैलाला महाराष्ट्रातील सीमा भागातील जनतेने हिंदकेसरी ही पदवी दिली होती.कारभार गल्ली परिसरातून शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अंतिम संस्काराची भव्य मिरवणूक काढून त्याच्यावर आदरपूर्वक वडगाव स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.
जनावर आणि शेतकऱ्याचे काय नाते असते हे या अंतिम संस्कारावरून आणि पाखरे कुटुंबीयांच्या हुंदक्यावरून दिसत होते.