Friday, January 24, 2025

/

स्वतंत्र उत्तर कर्नाटकचे स्वप्न विरले!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार आणि वनमंत्री उमेश कत्ती यांचे बंगळूरमध्ये मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भाजपमधील मुत्सद्दी नेते, ज्येष्ठ राजकारणी आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले उमेश कत्ती यांच्या निधनानंतर भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सहावेळा आमदारपद आणि २ वेळा मंत्रीपदी विराजमान झालेल्या उमेश कत्ती यांनी बेळगावसह राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. उत्तर कर्नाटकाचा विकास, अखंड कर्नाटक यासह बेळगावच्या त्रिभाजनाचा मुद्दा उचलून धरत अलीकडे त्यांनी अनेक राजकीय बदल घडवून आणले. बेळगाव काँग्रेसमधील किंगमेकर असलेले सतीश जारकीहोळी यांना त्यांच्याच यमकनमर्डी मतदार संघात मात देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना यमकनमर्डी मतदार संघात प्रभारी बनवण्यात आले होते. मात्र काळाला या गोष्टी मान्य नव्हत्या. आणि भाजपामधील एका ज्येष्ठ राजकारण्याची एक्झिट झाली. यामुळे भाजपाला मोठे नुकसान सोसावे लागणार तर आहेच परंतु पुन्हा नव्या पद्धतीने मोर्चेबांधणीला सुरुवातही करावी लागणार आहे.

१९८३ साली उमेश कत्ती यांचे वडील विश्वनाथ कत्ती यांचे निधनही बेंगळुरूमध्येच झाले होते. त्यांच्यावरदेखील बेळगाव जिल्ह्यात मध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यावेळी वाहतूक व्यवस्था आजच्याइतकी वेगवान नसल्याने अँबेसिडर वाहनातून अनेक मंत्री बेळगावमध्ये दाखल झाले होते. उमेश कत्ती यांनी आजतागायत सहावेळा आमदारपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळविला.

Katti angadi
File pic: late umesh katti and suresh angadi while they auto rikshaw few years ago

१९८५ साली सर्वप्रथम जनता पक्षातून निवडणूक लढवून आमदारपदी निवडून आले. जनता पार्टी, निधर्मी जनता दल, काँग्रेस आदी पक्षातून त्यांना हुक्केरी मतदार संघातून निवडणूक लढविता आली. मात्र काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षातून आमदारपदी ते विजयी झाले होते. त्यानंतर भाजपमध्ये समावेश घेऊन त्यांनी भाजपमध्ये आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली.

२००९ साली त्यांनी स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी त्यांनी उचलून धरली. अनेक भाषणासह वैयक्तिक पातळीवर रोखठोख बोली यासह हसत खेळत प्रत्येकाशी वागणूक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. विधानसौध असो किंवा सामाजिक व्यासपीठ प्रत्येक ठिकाणी आपल्या रोखठोख शैलीत ते आपले मुद्दे मांडत असत. २००९ साली बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौध स्थापन झाल्यानंतर स्वतंत्र उत्तर कर्नाटकाच्या मागणीसाठी त्यांनी जोर केला. तत्कालीन कुमारस्वामी सरकारच्या काळात बेळगावमध्ये कन्नड विश्वसाहित्य संमेलन भरविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. सातत्याने आपल्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचे आहे, अशी इच्छा ते बोलून दाखवत. उमेश कत्ती यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने करून राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेतले. कत्ती, जारकीहोळी, सवदी हे बेळगावच्या राजकारणातील महत्वाचे दुवे होत. या त्रिकुटाचे निर्णय नेहमीच शिक्कामोर्तब केले जायचे.Umesh katti

१४ मार्च १९६१ रोजी जन्मलेले उमेश कत्ती हुक्केरी येथील श्रीमंत आणि प्रसिद्ध कुटुंबातील होते. राजकारण, कारखाने, सहकार क्षेत्र यासह विविध क्षेत्रात हे कुटुंब कार्यरत आहे. विश्वराज साखर कारखाना, हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना यावर देखील कत्ती कुटुंबाचे राज्य आहे. यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील राजकारणात सक्रिय आहेत. कत्ती कुटुंबाने बेळगावच्या भरभराटीच्या सहकार क्षेत्रावर पकड मिळवली आणि अखेरीस राजकारणाच्या क्षेत्रात मोठे यश गाठले.

गेल्या एक दशकापासून उमेश कत्ती यांनी राजकारणात स्वतःचा असा एक विक्रम नोंदविला. नऊपैकी ८ निवडणुकीत विजय मिळवत सातत्याने स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी उचलून धरली. राज्य पुनर्रचनेनंतर हा भाग दुरलक्षित राहिला असून विकासापासून वंचित राहिला आहे. स्वतंत्र उत्तर कर्नाटकाचा मुद्दा, लोकप्रियतेमुळे उत्तर कर्नाटकातील लिंगायत समाजातून त्यांना मिळालेला मोठा पाठिंबा यामुळे त्यांनी स्वत:ला मुख्यमंत्रीपदासाठी गृहीत धरत याबाबतची इच्छाही बोलून दाखविली होती. बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने उमेश कत्ती यांना मंत्रिमंडळात सामील केले नव्हते परंतु नंतर पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून त्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली. यानंतर सातत्याने राजकारणात आपला वेगळा ठसा, रोखठोख स्वभाव आणि बोली यामुळे बेळगावच्या राजकारणातील ते महत्वाचा दुवा ठरले. उमेश कत्ती यांच्या निधनामुळे भाजपने मात्र एक धुरंधर राजकारणी गमावला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपाला बसलेला हा एक मोठा फटका आहे. स्वतंत्र उत्तर कर्नाटकाची मागणी, बेळगावच्या त्रिभाजनाचा मुद्दा ज्यांच्या माध्यमातून चर्चेत आला त्या उमेश कत्ती यांच्या जाण्याने या साऱ्या मागण्या तूर्तास तरी विरल्या असल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.