शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने शहरातील प्रमुख मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी घातली असली तरी यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार येळ्ळूर रोड येथे आज सकाळी घडला.
मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडणाऱ्या रस्ते दुर्घटना लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी घातली आहे. ही बाब प्रशासनीय असली तरी त्या बंदीचा विपरीत परिणाम उपनगरांमध्ये पहावयास मिळत आहे.
शहरातील प्रमुख मार्गावर बंदी असल्यामुळे मालवाहू ट्रक वगैरे अवजड वाहनाचे चालक शहर उपनगरातील इच्छित स्थळी अथवा शहराबाहेरील महामार्गावर पोहोचण्यासाठी उपनगरांमधील रस्त्यांचा अवलंब करू लागले आहेत. या प्रकारामुळे येळ्ळूर रोड येथे आज सकाळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
येळ्ळूर रोड येथे मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रकमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. जुने बेळगावकडून अनगोळच्या दिशेने जाणारा हा ट्रक रस्त्यावर आडवा आल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी व दुचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
यामुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच तातडीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. तरी याची दखल घेऊन रहदारी पोलिसांनी येळ्ळूर रोड येथे पुन्हा असा प्रकार घडणार नाही यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.