हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फाउंडेशनतर्फे नवरात्रोत्सवाच्या आज पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिनी ‘दुर्गामाता दौड’मध्ये सहभागी झालेले धारकरी व शिवभक्तांसाठी पिण्याचे पाणी -पेयाची सोय करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या माध्यमातून आज सोमवारपासून शहरात भव्य दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फाउंडेशनतर्फे शिवसेना-युवासेना बेळगांवच्या सहकार्याने दौंडमध्ये सहभागी धारकरी व शिवभक्तांसाठी ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
शिवसेना प्रमुखांच्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या तत्त्वाला अनुसरून हा उपक्रम राबविण्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी राधेश शहापूरकर, अवधूत कंग्राळकर, प्रतिक देसुरकर, वृषभ भोसले, ओमकार बेळगावकर, चेतन गंगाधर, ओमकार भोबुळकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
शहापूर शिवाजी उद्यान येथून आजच्या दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संत सेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्रीनगर, गुडशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर आठल्ये रोड, महाद्वार रोड चौथा क्रॉस, माणिकबाग, समर्थनगर, महाद्वार रोड तिसरा व दुसरा क्रॉस, संभाजी गल्ली, एसपीएम रोड मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे या दौडची सांगता झाली.