पाकिस्तान जिंदाबाद! सारख्या देश विरोधी घोषणा देणाऱ्यांच्या मुसक्या वेळीच आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच पीएफआय, सीमी सारख्या देशद्रोही देश घातक संघटनांवर कायमची बंदी घालावी अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदन स्वीकारून ती त्वरित केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी देश विघातक शक्तींचा तीव्र निषेध करून त्यांचा तात्काळ विमोड करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
देशात कार्यरत आतंकवादी संघटनांच्या विरोधात आपल्या हिंदू संघटनेच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आम्ही सरकारला निवेदनं देत आहोत. या निवेदनांद्वारे पीएफआय, सीमी सारख्या देशद्रोही, देश घातक संघटनांवर कायमस्वरूपी बंदी घालावी. आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करून देशातील दहशतवादाचे समोर उच्चाटन करावे अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र त्याबाबतीत म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली नाही.
आज हिंदुस्तानचेच खाऊन पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. हे देशासाठी घातक आहे. पुण्यात अलीकडेच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याचा प्रकार घडला आहे. याकडे सरकारने अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित देशद्रोह्यांच्या वेळीच मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे असे कोंडुसकर यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे गोवंशाला धोकादायक ठरलेल्या शहरासह ग्रामीण भागातील लंपी स्कीन रोगाला तात्काळ पायबंद घालण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जावी. या रोगामुळे आपली जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी, अशीही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.