गणपती विसर्जनापासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने सोमवार पर्यंत शहर परिसराला झोडपून काढले. पावसाची संततधार सोमवारी रात्रीपर्यंत सुरूच होती. मात्र, मंगळवारी पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असून तीन-चार दिवसांनी बेळगावंकरांना सूर्यदर्शन झाले आहे.
परतीच्या पावसामुळे शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन पुन्हा एकदा नदी-नाल्यांना पूर आल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी पावसाने घेतलेली विश्रांती शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच हितावह ठरली असून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे सर्व शिवारे तुडुंब झाली असून रात्रंदिवस पडत असलेल्या पावसामुळे नदी-नाले, विहिरी देखील तुडुंब भरल्या आहेत. पावसाची संततधार सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली होती. मात्र मंगळवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने वातावरण पूर्ववत होत असल्याचे दिसून आले. अनंत चतुर्दशीपासून सलग चार दिवस पाऊस कोसळत असल्याने हवेमध्ये कमालीचा गारठा निर्माण झाला होता, त्यातही चार दिवस सूर्यदर्शन देखील झाले नव्हते.
मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून अधूनमधून हलक्या सारी कोसळत आहेत. रस्त्यावरील चिखल आणि ठिकठिकाणी साठलेले पाणी शिवाय ड्रेनेज समस्येमुळे घराघरात शिरलेले पाणी अशी परिस्थिती तब्बल चार दिवस ठीकठिकाणी पाहायला मिळाली.
मंगळवारी दिवसभर उंपावसाच्या खेळाने श्रावण महिन्याचा अनुभव आला. दरम्यान वातावरणात अचानक गारठा निर्माण झाला असून आणखी पाऊस पडण्याची शक्यताही काहींनी व्यक्त केली.