बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या इंस्टाग्राम खात्यावर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी पडल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. याबाबत स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखांनीच (एसपी) ट्विटरवर माहिती देऊन जनतेला सावधगिरीचा इशारा दिला आहे.
माझे नांव आणि फोटो वापरून इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडण्याद्वारे लोकांकडे पैसे मागितले जात असल्याचा गैरप्रकार निदर्शनास आला आहे. या संदर्भात कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनी अशा बनावट खात्यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आवाहनाला बळी पडू नये. त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव एम. पाटील यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.
दरम्यान आता सायबर गुन्हेगार लोकांना लुबाडण्यासाठी चक्क जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नावाचा वापर करू लागल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.