रघुनाथ पेठ अनगोळ येथील घर कोसळून लाखोंचे नुकसान झालेल्या त्या पीडित कुटुंबाला आर्थिक देत श्रीराम सेनेने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे.शनिवारी दुपारी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी स्वता महादेव होळकर या पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले आणि आर्थिक मदत देऊ केली.
अतिवृष्टीमुळे कमकुवत झालेले घर अचानक कोसळून मोठे नुकसान झाल्याची घटना रघुनाथ पेठ अनगोळ येथे शुक्रवारी दुपारी घडली होती . अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती मात्र अत्यंत गरीब असलेल्या या कुटुंबास धीर देण्याचे काम श्रीराम सेनेने केले आहे.
कोसळलेले घर प्रकाश महादेव होळकर या भाजी विक्रेत्याच्या मालकीचे आहे. प्रकाश हा रस्त्याकडेला भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. आई वडील पत्नी दोन मुले असे त्याचे कुटुंब आहे. रघुनाथ पेठ अनगोळ येथील होळकर यांचे जुने घर अलीकडच्या मुसळधार पावसामुळे कमकुवत बनले होते. काल शुक्रवारी दुपारी प्रकाश भाजी विक्रीच्या कामासंदर्भात घरा बाहेर होता.
त्याचप्रमाणे त्याची पत्नी देखील कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरामध्ये प्रकाशची आई आपल्या मुली समवेत गप्पा मारत बसली होती. त्यावेळी अचानक छताची माती खाली पडायला लागल्यामुळे दोघीही घाबरून घराबाहेर पडल्या. त्यानंतर कांही क्षणातच दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आतील बाजूने संपूर्ण घर खाली कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नसली तरी घरगुती साहित्यासह घरात ठेवलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.