बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांशी बायसिकल शेअरिंग योजनेसाठी 300 सायकली दाखल झाल्या असून शहरातील पहिल्या 10 डॉकिंग स्टेशनच्या निर्मितीचे काम पूर्ण होताच येत्या नोव्हेंबरमध्ये भाडेतत्त्वावर सायकल मिळणारी ही योजना कार्यान्वित होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार सायकल शेअरिंग योजनेतील सायकली ठेवण्यासाठी शहरात डोकिंग स्टेशन्स तयार केले जाणार आहेत. त्यासाठी शहरात विविध ठिकाणच्या 20 जागा देखील निवडण्यात आल्या आहेत. या सर्व जागांसाठी महापालिकेने ना -हरकत दिल्यानंतर गेल्या मार्चपासून आरेखन व टॉकिंग स्टेशनच्या निर्मितीचे काम सुरू झाले आहे.
शहरात आणखी कांही टॉकिंग स्टेशन तयार केले जाणार असून त्यासाठी पुन्हा महापालिकेकडून ना -हरकत घेतली जाणार आहे. सध्या 20 पैकी पहिल्या 10 डॉकिंग स्टेशनच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या नोव्हेंबरमध्ये बायसिकल शेअरिंग योजना सुरू होईल, अशी माहिती स्मार्ट सिटी विभागाकडून मिळाली आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील या बाइसिकल शेअरिंग योजनेच्या कामाचा ठेका धरणी नामक ठेकेदाराला मिळाला आहे. या योजनेतून बाइक्स कंपनीच्या सायकली बेळगावकरांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यांच्यासाठी स्मार्ट बायसिकल शेअरिंग नामक स्मार्ट ॲप तयार केले जाणार असून त्याचा वापर करून सायकली भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत. या योजनेतील प्रत्येक सायकलसाठी असलेला युनिक कोड स्कॅन करून नागरिकांना सायकल अनलॉक करता येईल.
त्याच माध्यमातून सायकलचे भाडे अदा करता येईल. सायकल किती काळ वापरली जाते त्यावर भाडे निश्चिती करण्यात आली आहे. नजीकच्या डॉकिंग यार्डमधून सायकल घेऊन नागरिकांना शहरात कोठेही कामासाठी जाता येईल. काम पूर्ण झाल्यावर नजीक जे डॉकिंग स्टेशन असेल तेथे सायकल जमा करता येणार आहे.