महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या वतीने नवीन विधिज्ज्ञ सी. एस. वैद्यनाथन हे मराठी लोकांची बाजू मांडणार आहेत. रिक्त जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी ते सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अॅडव्होकेट ऑन रेकॉडं शिवाजी जाधव यांनी दिली आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या बाजुने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विधिज्ज्ञ हरिष साळवे बाजू मांडत आले आहेत. पण आता ते लंडनला स्थायिक झाले आहेत. तर ज्येष्ठ विधिज्ज्ञ अरविंद दातार आणि राजू रामचंद्रन यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सी. एस. वैद्यनाथन यांंची नियुक्ती करण्यात आली आहे.
सीमाप्रश्नी त्यांना माहिती असून दाव्याचा इतिहास त्यांना कथन केला जाणार आहे. ते यापुढे मराठी जनतेची बाजू मांडणार आहेत. अयोध्येसह तामीळनाडू, केरळ येथील अनेक महत्वाचे खटले त्यांनी यशस्वी लढले आहेत.
येत्या 13 किंवा 14 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या उच्चाधिकार आणि तज्ज्ञ समितीच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब आणि इतर रिक्त जागा भरण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सीमाप्रश्नी माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सी. एस. वैद्यनाथन हे राजू रामचंद्रन, अरविंद दातार यांच्या जागी काम पाहाणार आहेत. कर्नाटकाचा अंतरिम अर्ज कसा चुकीचा आहे, यावर आमचा युक्तीवाद असणार असून 23 नोव्हेंबरला तो निकालात निघण्याची शक्यता आहे.
तो अर्ज निकालात निघाल्याशिवाय याचिकेचे कामकाज पुढे जाऊ शकत नाही.
अशी माहितीशिवाजी जाधव, अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड यांनी दिली.