सिग्नलच्या प्रतीक्षेत रेल्वे मालगाडी जवळपास अर्धा तास जागीच थांबून राहिल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांची गैरसोय झाल्याची घटना आज सकाळी चौथ्या रेल्वे गेट घडली.
टिळकवाडी भागातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी रेल्वे गाडी थांबून राहिल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. त्याच प्रकारची वाहतूक कोंडी आज शनिवारी सकाळी अनगोळ -उद्यमबाग येथील चौथ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी झाली होती. सिग्नल पडण्यास उशीर झाल्यामुळे या गेटमध्ये रेल्वे मालगाडी जवळपास अर्धा तास थांबून होती.
परिणामी रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर दुचाकी आणि चार चाकी वाहनांची एकच गर्दी होऊन वाहतूक ठप्प झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
अर्धा तास गेटच्या ठिकाणी अडकून पडल्यामुळे वेळेचा अपव्यय आणि कामाचा खोळंबा झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर सुमारे अर्ध्या तासानंतर सिग्नल पडून रेल्वे मालगाडी पुढे मार्गस्थ झाली आणि सर्व वाहन चालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तिसऱ्या रेल्वे गेट मध्ये रेल्वे उड्डाण पुलांमुळे या भागांत अनेकदा रहदारीचा अडथळा निर्माण होत असतो त्यातच रेल्वे मुळे ट्रॅफिक जाम झाली होती.तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून सदर ब्रिज जनतेसाठी वाहतुकीला खुला करावा अशी मागणी वाढत असताना होणारे ट्रॅफिक जाम जनतेची डोकेदुखी ठरत आहेत.