शहरातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या (व्हीटीयू) नूतन उप कुलगुरूपदी कर्नाटक मुक्त विद्यापीठ म्हैसूरचे उपकुलगुरू डॉ. विद्याशंकर एस. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हीटीयूचे कुलगुरू आणि राज्याचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज गुरुवारी तशी अधिकृत घोषणा केली आहे.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. करिसिद्धप्पा यांच्या निवृत्तीमुळे उपकुलगुरूपद रिक्त होते. प्रा. करिसिद्धप्पा यांनी तब्बल 6 वर्षे अतिशय सक्षमपणे आणि कोणताही आरोप न होऊ देता आपला कार्यकाळ यशस्वीपणे पार पडला.
तथापि असे असतानाही कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात व्हीटीयुच्या विकासासाठी त्यांनी केलेली कामे, राबविलेल्या योजनांवर कांही जणांनी आक्षेप घेतला होता. डॉ. करिसिद्धप्पा यांची सर्वप्रथम 24 सप्टेंबर 2016 रोजी विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या उपकुलगुरूपदी नियुक्ती झाली होती. पुढे 26 सप्टेंबर 2019 रोजी त्यांना पुन्हा तीन वर्षासाठी विद्यापीठाचे उप कुलगुरू म्हणून मुदतवाढ देण्यात आली.
त्यानंतर निवृत्तीनंतरही प्रा. करिसिद्धप्पा यांचा कालावधी नियमित उप कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत 26 सप्टेंबर 2022 रोजी आणखी एक महिन्यांनी वाढविण्यात आला होता.
या कालावधीत व्हीटीयुच्या नूतन उपकुलगुरू पदावर वर्णी लागण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले होते. या स्पर्धेत म्हैसूर स्थित कर्नाटक मुक्त विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. विद्याशंकर एस., नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोव्याचे संचालक डॉ. गोपाळ मुगेरया आणि व्हीटीयुचे निबंधक असणारे बेळगावचे डॉ. ए. एस. देशपांडे हे तिघेजण आघाडीवर होते. अखेर निवड समितीने यापैकी डॉ. विद्याशंकर एस. यांना पसंती देत 3 वर्षाच्या कालावधी करिता व्हीटीयुच्या नूतन उप कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली.
या शिफारसीवर कर्नाटकचे राज्यपाल व व्हीटीयुचे कुलगुरू थावरचंद गहलोत यांनी शिक्कामोतर्ब केले आहे. आता डॉ. विद्याशंकर एस. हे आगामी 3 वर्षासाठी व्हीटीयुचे उपकुलगुरू म्हणून काम पाहणार आहेत.