बेळगाव शहरातील आरटीओ सर्कल ते कोर्ट आवारापर्यंतच्या धोकादायक वृक्षांची पाहणी करून ती झाडे युद्धपातळीवर हटवावीत, अशी मागणी बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्षाने वनविभागाकडे केली आहे.
ग्रामीण काँग्रेसतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन आज वनविभागाला देण्यात आले. या वर्षभरात बेळगावमध्ये विविध ठिकाणी झाड पडून अपघात होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कांही घटनांमध्ये कोसळणारी झाडे जीवावर देखील बेतली आहेत.
आरटीओ सर्कल येथे झाड पडल्याने नुकताच एका युवकाचा मृत्यू झाला. शहरात विविध ठिकाणी अनेक झाडे जीर्ण झाली असून ती केंव्हा कोसळतील याचा नेम नाही. यामुळे अशा धोकादायक परिस्थितीतील झाडे, झाडांच्या फांद्या छाटुन संभाव्य दुर्घटना टाळाव्यात. विशेषतः आरटीओ सर्कल ते कोर्ट आवारापर्यंतच्या रस्त्यावर सतत रहदारी असते.
दोन दिवसापूर्वी या ठिकाणी झाड कोसळून युवकाचा मृत्यू झाला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागाने दक्षता घेणे गरजेचे आहे. या भागात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात रहदारीसह विविध ठिकाणचे लोक कोर्टकचेरीच्या कामासाठी येत असतात.
त्यांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी आरटीओ सर्कल ते कोर्ट या भागातील जुनाट वृक्षांची पाहणी करून ते हटवावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.