राज्यातील भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांक अनुदानित शाळांमधील रोस्टर अर्थात आरक्षण पद्धत रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. सरकारकडून अधिसूचित या निर्णयामुळे बेळगाव, चिकोडी तसेच सीमा भागातील मराठी शाळांना मोठा फायदा होणार आहे.
रोस्टर पद्धत बंद करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वच मराठी, उर्दू व अन्य भाषिक तसेच धार्मिक अल्पसंख्यांक शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे. रोस्टर पद्धत रद्द झाल्याने अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया राबविता येणार असून कांही शाळांमध्ये सेवा बजावणाऱ्या शिक्षकांची सेवा रोस्टरमुळे नियमित झाली नव्हती ती आता नियमित होणार आहे. रोस्टर पद्धत रद्द करावी यासाठी बेळगावातील सर्व मराठी शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली होती. शिवाय उच्च न्यायालयात ही धाव घेतली होती. न्यायालयाने देखील भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांक शाळांना रोस्टर लागू करणे चुकीचे असल्याचा निर्णय दिला होता.
भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांक शाळांमधील रोस्टर पद्धत रद्द करण्याच्या निर्णयाबाबत शिक्षण संस्था नियमात दुरुस्ती करण्यासाठीच्या निर्णयाचा मसुदा 15 जुलैला प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. तथापि या कालावधीत एकही अक्षय किंवा सूचना नोंदवली गेली नसल्याने शासनाकडून गोष्ट रद्दचा हा निर्णय अधिसूचित करण्यात आला आहे. याखेरीज हा निर्णय काल शुक्रवार 2 सप्टेंबरपासून लागूही करण्यात आला असून या निर्णयाचा फायदा बेळगाव, चिकोडी तसेच सीमा भागातील मराठी शाळांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.