परतीच्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रविवारचा दिवस देखील पावसातच गेला. रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने बेळगाव शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले होते.तर काही भागांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परतीचा पाऊस शुक्रवार पासून सुरू झाला होता, रविवारी देखील दमदार पाऊस कोसळल्याने बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. परिणामी सुट्टीच्या दिवशी नागरिकांची दमछाक उडाली.
उपनगरासह शहरात झालेल्या या दमदार पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले भाजी विक्रेते तसेच व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.पावसामुळे बाजारात दल दल झाली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना देखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता, रविवारी पहिले महाळ असल्यामुळे आवश्यक साहित्य खरेदीसाठी अनेकांनी बाजारात हजेरी लावली होती. मात्र पावसाची संततधार सुरू झाली असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला परिणामी बाजारपेठेत विस्कळीतपणा आल्याचे चित्र दिसून आले.
याशिवाय थोडा पाऊस झाला की ठीक ठिकाणी साचणारे पाणी आणि यामुळे घरात घुसणारे पाणी हे बेळगावकरांसाठी नेहमीचीच डोकेदुखी आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे देखील अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. परिणामी घघरात शिरलेले पाणी काढण्यासाठी महिला लहान मुलांची धडपड सुरू होती.
पावसाचा जोर इतका होता की सखल भागातही पाणीच पाणी झाले होते शिवाय खड्डे देखील तुडुंब भरल्याने हा सदर परतिचा पाऊस नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला. बेळगाव शहरातील फोर्ट रोड, गोवावेस सर्कल, गांधी नगर आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी आले होते.गणेश विसर्जना नंतर अनेक ठिकाणीचे मंडप काढायचे बाकी आहेत रविवारी पावसाने काही ठिकाणचे मंडप काढण्यात आले नव्हते.
विशेषतः सदर परतीच्या पावसामुळे शेतीला जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांसाठी हा हितावह ठरला आहे. यामुळे पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. सदर पावतीच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून मागील आठवड्याभरापासून वातावरण उष्ण झाले होते यामुळे सदर पाऊस शेतकऱ्यांबरोबरच वातावरणात गारवा देणारा ठरला आहे.