विविध शासकीय विभागांच्या मंजुरीनंतर कणबर्गी निवासी योजनेचा आराखडा आता मंत्रिमंडळ मंजुरीसाठी बेंगलोरला पाठविण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजुरी मिळतात निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्याद्वारे बुडाकडून लगेचच या योजनेचे काम सुरू होईल.
कणबर्गी योजनेचा आराखडा जुलै 2021 मध्ये मंत्रिमंडळ मंजुरीसाठी पाठविला होता. बुडाने पाठपुरावा करूनही तो मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला आलाच नाही. त्यामुळे कणबर्गी योजनेसाठी 16 वर्षांपूर्वी आपली जमीन देणारे शेतकरी आक्रमक झाले होते. आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नगर विकास खात्याचे सचिव अजय नागभूषण यांची भेट घेतली होती.
त्यावेळी नागभूषण आणि मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत आराखडा मंजूर होईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार गेल्या जुलै 2022 मध्ये कणबर्गी निवासी योजनेच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.
सदर मंजुरीचा निर्णय 2 ऑगस्ट रोजी शासनाकडून अधिसूचित करण्यात आला होता. त्यानंतर पाठपुराव्यांती हेस्कॉम, नगर विकास खाते आणि पाणी पुरवठा मंडळ या तीनही विभागाकडून ना -हरकत आणि मंजुरी मिळाल्यामुळे आराखडा अंतिम मंजुरीसाठी पुन्हा बेंगलोरला पाठविण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल.
आधीच चर्चा झालेली असल्याने आता केवळ मंजुरीची औपचारिकता शिल्लक असल्याचे बुडाचे म्हणणे आहे. दरम्यान योजनेचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार? याची प्रतीक्षा जमीन मालकांना लागली आहे. त्यामुळे त्यांना माहिती देण्यासाठी बुडाकडून लवकरच बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.