बेळगाव महापालिकेसह राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाह्य कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या 11,133 पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दल बेळगाव महापालिका पौरकार्मिकांच्यावतीने आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना धन्यवाद दिले आहेत.
राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाह्य कंत्राटी तत्त्वावर नेमणूक झालेल्या 11,133 पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल सोमवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना यापुढे सरकारी कर्मचारी म्हणून गृहीत धरले जाणार आहे. शिवाय त्यांना वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील 302 नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकांमधील 5533 कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे बेंगळूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 3673 कर्मचारी आणि बेळगावसह इतर दहा महानगरपालिकांमधील 1927 पौरकार्मिकांना सेवेत कायम केले जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सेवेत कायम करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे.
या संदर्भात आज मंगळवारी बेळगाव लाईव्हसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके वरील प्रमाणे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. ते म्हणाले की, सरकारने आपल्याला नोकरीत कायम करावे, अशी बेळगाव महापालिकेमध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या पौरकार्मिकांची मागणी होती.
गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी असल्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ती पूर्ण केली आहे. याबद्दल बेळगाव महापालिकेतील पौरकार्मिकांच्यावतीने मी मुख्यमंत्री बोम्मई यांचे आभार मानून धन्यवाद देतो असे सांगून पौरकार्मिकांसाठी हा विशेष आनंदाचा दिवस आहे असे म्हणण्यास हरकत नाही, असे आमदार ॲड. बेनके म्हणाले.