यंदाचे शालेय शैक्षणिक सुरू होऊन चार महिने झाले तरी बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शालेय विद्यार्थ्यांना सरकारकडून अद्यापही गणवेशाचे वितरण करण्यात आले नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राज्य सरकारकडून दरवर्षी सरकारी शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय गणवेश आणि बूट-सॉक्स मोफत पुरविण्याची योजना राबविली जाते. मागील शैक्षणिक वर्षात ही योजना वेळेवर राबविण्यात आली होती. मात्र यंदा गणवेश वितरणात विलंब झाला आहे.
बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात विशेष करून पूर्व भागातील सरकारी शाळांना अद्यापही गणवेशाचे कापड मिळालेले नाही. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर एक दोन महिन्यात विद्यार्थी विद्यार्थिनींना सरकारकडून शालेय गणवेश उपलब्ध करून दिला जातो. यंदाही तशी अपेक्षा होती, परंतु तालुक्याच्या पूर्व भागातील शाळांना अद्यापपर्यंत गणवेशाचे वितरण झालेले नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने किमान गेल्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सरकारकडून गणवेश वितरण अपेक्षित होते. मात्र तेंव्हाही शिक्षकवर्गासह पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचा अपेक्षाभंग झाला.
आता शैक्षणिक वर्षाचा जवळपास चार महिन्याचा कालखंड उलटला तरी शालेय गणवेशाचा पत्ता नसल्यामुळे मुलांना घरातील कपड्यांवर शाळेत हजेरी लावावी लागत आहे. सरकारच्या शालेय गणवेशाच्या बाबतीतील या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तेंव्हा लोकप्रतिनिधी आणि शिक्षण खात्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शालेय गणवेशाचे वितरण लवकरात लवकर होईल, अशी कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.