सर्वजण झोपलेले असताना अज्ञात मारेकऱ्यांनी घरात घुसून एका रियल इस्टेट एजंटचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना कॅम्प फिश मार्केटनजीक आज सकाळी उघडकीस आली. यामुळे कॅम्प परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुधीर कांबळे (वय 57) असे खून झालेल्या रियल इस्टेट एजंटचे नाव आहे. सुधीर हे पूर्वी दुबई येथे कामाला होते. कोरोनामुळे 2 वर्षांपूर्वीच ते कॅम्प -बेळगाव येथे स्थायिक झाले होते. काल रात्री उशिरा घरात घुसलेल्या अज्ञात मारेकरांनी सुधीर यांची पत्नी व मुले बाजूच्या खोलीत झोपलेले असताना कुणाच्याही नकळत सुधीर यांची निर्घृण हत्या केली. मारेकर्यांनी धारदार शस्त्राने सुधीर यांच्या पोटात, मानेवर, हातावर चेहऱ्यावर प्राणघातक वार केल्याने ते जागीच गतप्राण झाले.
घरातील एका खोलीच्या कोपऱ्यात सुधीर यांचा मृतदेह आज सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. खुनाची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस उपायुक्त गडादी यांनी हत्याकांडाची माहिती दिली. काल शुक्रवारी रात्री उशिरा ही हत्या झाली असल्याचे सांगताना सुधीर यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास कार्य हाती घेतले असून लवकरच मारेकऱ्यांना शोधून काढू. मृताची पत्नी व मुले वेगवेगळ्या खोलीत झोपली असल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. यासंदर्भात कसून चौकशी करण्यात येईल, असे गडादी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिबिर हॉस्पिटलला धाडला. आता सुधीर कांबळे यांच्या हत्या का? व नेमकी कशासाठी करण्यात आली? हे पोलीस तपासातूनच उघड होणार आहे.