Wednesday, December 18, 2024

/

मराठा बँकेला 2.61 कोटींचा निव्वळ नफा -चेअरमन पवार

 belgaum

मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगावला यंदाच्या अहवाल साली 2 कोटी 61 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून 2021 -22 च्या सरकारी लेखा परीक्षणानुसार बँकेला ऑडिट ‘ए’ मिळालेला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली.

मराठा बँकेची 80 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या रविवार दि. 11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता मुख्य शाखा बसवान गल्ली येथे बोलावण्यात आली आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत चेअरमन दिगंबर पवार बोलत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा को. ऑप. बँकेला यंदाच्या अहवाल साली 2 कोटी 61 लाख 9 हजार 604 रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. बँकेची 31 मार्च 2022 रोजी सभासद संख्या 11794 इतकी असून भाग भांडवल 2 कोटी 70 लाख 4 हजार 900 रुपये इतके आहे.

रिझर्व बँक व इतर फंड 62 कोटी 51 लाख 94 हजार 480 रुपये तर ठेवी 161 कोटी 10 लाख 65 हजार 918 रुपयांच्या आहेत. बँकेने 116 कोटी 18 लाख 1 हजार 866 रुपये कर्ज वितरण केले असून वसुली समाधानकारक आहे. मराठा बँकेची गुंतवणूक 107 कोटी 32 लाख 42 हजार 862 रुपये इतकी आहे. यंदा देखील ऑडिट ‘ए’ वर्ग मिळवणाऱ्या मराठा बँकेचे खेळते भांडवल 31 मार्च 2022 रोजी 235 कोटी 91 लाख 89 हजार 268 रुपये इतके आहे.

सामाजिक उपक्रम राबवत बँकेने आर्थिक दृष्ट्या अग्रक्रम क्षेत्रास 77.27 टक्के आणि दुर्बल घटकास 47.90 टक्के कर्जाचे वितरण केले आहे. सभासदांच्या ठेवी सुरक्षितेसाठी बँकेने 5 लाखापर्यंत विमा उतरवला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर दिड टक्का जादा व्याजदर देण्यात येत आहे.Digbambar pawar

‘ग्राहक देवो भव” या उक्तीप्रमाणे बँकेने नेहमीच ग्राहक सेवेस प्राधान्य दिले आहे. उत्तम तत्पर ग्राहक सेवा करिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब बँकेने केलेला आहे. कोअर बँकिंग प्रणालीमुळे ग्राहकांना कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येत आहेत. मुख्य शाखेसह मार्केट यार्ड, नरगुंदकर भावे चौक व खानापूर रोड येथील शाखांमध्ये स्वतःचे एटीएम मशीन सुरू केले आहे. मराठा बँक ग्राहकांना सुरक्षित डिजिटल बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून संचालक मंडळाने ‘अ’ वर्ग सभासदांना 15 टक्के व असोसिएट सभासदांना 8 टक्के डिव्हिडंट देण्याची शिफारस केली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

वयाची 55 वर्षे व सभासद होऊन 20 वर्षे झालेल्या सभासदांना वृद्धापकालीन सुविधा म्हणून 2500 रुपये सहकार्य निधी दिला जातो.

बँकेने चॅरिटी फंडातून परिसरातील अनेक शैक्षणिक संस्थांना भरीव आर्थिक मदत केली आहे. तसेच बेळगाव परिसरातील सामाजिक व विधायक कार्यात मराठा बँक सहकार्य करत आहे अशी माहितीही चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेस बँकेचे संचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.