अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे सन्नहोसूर (ता. खानापूर) येथील रेणुका तातोबा पाटील या महिलेला कोसळलेल्या घराची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. तेंव्हा आमदारांनी सदर महिलेला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सन्नहोसूर गावातील रेणुका तातोबा पाटील या महिलेचे घर अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसात कोसळून मोठे नुकसान झाले आहे. घर कोसळल्यामुळे रेणुका आणि त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे घर कोसळल्याची माहिती तात्काळ ग्रामपंचायत पीडीओ आणि तलाठी यांना कळवून देखील अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
माहिती घेऊन पंचनामा करण्यासाठी कोणताही अधिकारी रेणुका पाटील यांच्या कोसळलेल्या घराकडे फिरकलेला नाही. यासंदर्भात वारंवार विनंती करूनही रेणुका आणि त्यांच्या पतीला कोणी दाद देत नाहीत.
रेणुका तातोबा पाटील यांची घरची परिस्थिती बेताची आहे त्यात भर म्हणून आता घर कोसळल्यामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. तेंव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खानापूरचे आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून आपल्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी तातोबा बाळाप्पा पाटील यांनी केली आहे. गावकऱ्यांमधून देखील पाटील कुटुंबांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.