जिल्हास्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील युवा होतकरू कुस्तीपटू रवळनाथ कणबरकर आणि गावातील पहिली महिला कुस्तीपटू किरण बुरूड यांची कर्नाटक राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी अभिनंदन निवड झाली आहे.
बेळगाव येथे नुकतीच जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत कावळेवाडीचा गुणवंत कुस्तीपटू पै. रवळनाथ श्रीधर कणबरकर याने 65 वजनी गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. रवळनाथ हा इयत्ता आठवीत असून बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी येथे शिकत आहे. तो मठमती कुस्तीआखाडा, सावगाव येथे सराव करतो.
रवळनाथ प्रमाणे गावातील पहिली महिला कुस्तीपटू किरण य. बुरूड हिनेही गावच्या इतिहासात प्रथमच 49 किलो वजनी गटात बेळगाव जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. माध्यमिक विद्यालय कर्ले येथे दहावीत शिकणाऱ्या किरणला वडिलांचे मोठे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीमुळे रवळनाथ आणि किरण यांची आता राज्यस्तरावर निवड झाली आहे. सदर यशाबद्दल दोघांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तसेच हे यश गावासाठी अभिमानास्पद असल्यामुळे त्यांचा आदर्श इतर मुलांनी घेऊन अभ्यासाबरोबरच खेळाकडेही अधिक लक्ष द्यावे या हेतूने गावातील वाचनालयाचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी कुस्तीपटू रवळनाथ कणबरकर व किरण बुरुड यांना 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ही रोख रक्कम देऊन लवकरच एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला जाणार आहे.