बेळगावचे नाव सर्वच क्षेत्रात अव्वल स्थानावर येत आहे. आजतागायत अनेक क्षेत्रात बेळगावचे नाव उंचावले आहे. बेळगावमधील मुलीही कोणत्याच क्षेत्रात मागे नसून विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यात भर म्हणून आता ज्युडो स्पर्धेत मुलींनी घवघवीत यश संपादन करत यश गाठले आहे.
बेळगावच्या मुलींनी केरळात झेंडा रोवत जुडो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलं आहे. १ ते ५ सप्टेंबर पर्यंत केरळ येथील त्रिसूर येथे झालेल्या ‘खेलो इंडिया नॅशनल वुमन्स लीग रँकिंग’ स्पर्धेत बेळगाव डीवायईएस ज्यूडो सेंटरच्या महिला खेळाडूंनी ९ सुवर्ण, २ रौप्य आणि ९ कांस्य पदकांची कमाई केली आहे.
बेळगावच्या मुलींच्या जुडो टीमने सब ज्युनिअर गटात सर सर्वसाधारण विजेतेपद, ज्युनिअर सिनियर कॅडेट गटात उपविजेते पटकावले आहे. तसेच केरळ येथील स्पर्धेत ज्या खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले आहे त्यांची ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या ‘वुमन्स नॅशनल लीग’ मध्ये निवड झाली आहे. बेळगावच्या ज्यूडो कोच रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन या महिला खेळाडूंना लाभत आहे.
केरळमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर या ज्यूदोपटूंचे बेळगाव रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. केरळमध्ये मिळविलेल्या यशानंतर बेळगावमध्ये आलेल्या या महिला खेळाडूंचे रेल्वेस्थानकावर वाद्यांच्या गजरात, फुलांची आतषबाजी करत, तसेच खेळाडूंचे पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी या खेळाडूंचे रेल्वे स्थानकावर स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवून महिलांचे स्थान उंचावणाऱ्या महिलांमध्ये ज्युडोपटू महिला खेळाडूंचाही समावेश झाला असून बेळगावकरांमध्ये या महिला खेळाडूंचे कौतुक होत आहे.