कर्करोग हा असा आजार आहे ज्याच्या नावानेच माणूस आधी खचतो. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यावर योग्य औषधोपचार करून मात करणं शक्य आहे. पण त्याहूनही अधिक महत्वाची आहे ती कर्करोगग्रस्तांशी इतरांची वागणूक!
कर्करोगग्रस्तांना होणाऱ्या वेदना आपण कमी करू शकत नाही. मात्र त्यांना या वेदनेतून मानसिक दिलासा देण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. असाच प्रयत्न बेळगावच्या युवकाने केला असून कर्करोगग्रस्तांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलविण्यासाठी श्रीजित शशिकांत माने या युवकाने केशदान केले आहे. बऱ्याच लोकांना केशदानाविषयी माहिती नाही. कॅन्सर पीडितांसाठी केशदान करत जनजागृतीसाठी एक पोस्ट श्रीजितने शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केसदेखील दान केले जाऊ शकतात याबद्दल नागरिकांना आता माहिती उपलब्ध झाली आहे.
वैद्यकीय क्षेत्राकडून अवयव दानाची गरज व्यक्त केली जात असताना बेळगावच्या नेहरूनगर फर्स्ट क्रॉस येथील रहिवासी असलेल्या श्रीजीत माने याने चक्क आपल्या डोक्याचे केस दान करण्याद्वारे कॅन्सर पीडितांच्या चेहऱ्यावर स्मित फुलविण्याचा छोटेसा प्रयत्न केला आहे. विविध औषधांच्या सततच्या माऱ्यासह केमोथेरपी सारख्या उपचारांमुळे कॅन्सर पीडित रुग्णांना आपल्या शरीरावरील विशेषता डोक्याचे केस गमावावे लागतात. या रुग्णांना दिलासा देण्याचे काम ‘होप फाॅर इंडिया’ ही संस्था देशभरात करते. सदर संस्थेकडून कॅन्सर पीडितांना केसाचे टोप (विग) बनवून दिले जातात. यासाठी मानवी केसांची गरज भासत असल्यामुळे होप फाॅर इंडियाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्याकडून केस दान करण्याद्वारे ती गरज भागवली जाते. दान केले जाणारे केस किमान 12 इंच लांबीचे असावे लागतात.
होप फाॅर इंडियाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना श्रीजीत माने याने देखील नुकतेच आपले केस कॅन्सर पीडितांसाठी दान केले आहेत. या पद्धतीने केस दान करणारा तो बहुधा शहरातील पहिलाच युवक असावा. देशभरातील कॅन्सर पीडितांना दिलासा देण्यासाठी आपल्या प्रमाणे इतरांनीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या श्रीजितने ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना व्यक्त केली. त्यासाठीच त्याने केसाच्या वेणीचा झुबका हातात धरलेला आपला फोटो आणि सोबत जनजागृती दाखल फोटोच्या ओळी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
शेअर मार्केट व्यवसाय करणारा श्रीजीत विवेकानंद कॉलनी टिळकवाडी येथे क्रिस्टी डिमोन्स नावाचा डान्स क्लासही चालवतो. आपले केस दान करू इच्छिणाऱ्यांनी @hairforhopeindia या लिंकवर संपर्क साधण्याचे आवाहन त्याने केले आहे. श्रीजीत माने याची सेवाभावी परोपकारी वृत्ती पाहून युबीएस सलून चालक उमेश यांनी त्याचे केस मोफत कापून दिले हे देखील विशेष होय.