बिबट्याचा वावर असलेल्या बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसराच्या वनराईतील मोरांचा आवाज येणे अलीकडे बंद झाल्यामुळे बिबट्याने त्यांचा फडशा पडला की काय? अशी साशंकतापुर्ण भीती व्यक्त केली जात आहे.
गोल्फ मैदान परिसरात असलेल्या लोकवस्ती मधील प्रत्येक कुटुंबाला सध्या बिबट्याला पकडण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. या भागात सध्या अहोरात्र बिबट्याची चर्चा सुरु असते. महिना झाला बिबट्या सापडत नसल्याने येथील कुटूंबियांना भितीच्या वातावरणात तसेच प्रशासनाच्या बंधनात जगावे लागत आहे. गोल्फ कोर्स जंगलात अंदाजे 700 मोर वास्तव्यास असतात किंवा ये जा करत असतात अशी माहिती उपलब्ध आहे.
बिबट्या कधी सापडतो आणि आंम्ही भीतीच्या सावटातून मुक्त होतो याचीच चिंता त्यांना लागून राहिली आहे. याखेरीज गोल्फ मैदानाच्या वनराईत बरेच मोर असल्यामुळे पशुपक्षी प्रेमींना वेगळीच चिंता लागून राहिली आहे.
गोल्फ कोर्स मैदान परिसरातील बरेच वेगवेगळे पक्षी व मोठ्या प्रमाणात मोर असल्याने यापूर्वी त्यांचा सकाळी ओरडण्याचा आवाज ऐकावयास मिळत होता. बऱ्याचदा मोरांचे फुलवणारे पिसारे पाहण्यांची अद्ब्भूत संधी लाभत होती.
मात्र आता ते सर्वच बंद झाल्याने बिबट्याचा मुख्य आहार मोरच झाले कि काय? असे येथील नागरिकांना वाटू लागल आहे. या पद्धतीने मंडोळी येथे बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्यामुळे तेथून जवळच असलेल्या व्हॅक्सिन डेपो येथे मुक्त विहार करणाऱ्या मोरांच्या जीविताबाबतही साशक्यता व्यक्त केली जात आहे.